Drishyam 3: अजय देवगन चा सुपरहिट सस्पेन्स थ्रिलर दृश्यम च्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. मेकर्सनी अखेर ' दृश्यम 3' ची घोषणा केली असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. दृश्यमचा विजय साळगावकर पुन्हा एकदा मोठा पडद्यावर परतणार असल्याने चहा त्यामध्ये प्रचंड उत्साह आहे. दृश्यमच्या कथेत यावेळी कोणते नवे ट्विस्ट असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 'आखिरी हिस्सा अभी बाकी है...' असं म्हणत मेकर्सनी एक व्हिडिओ शेअर केलाय. (Drishyam 3 Trailer Out)
‘कहाणी अजून संपलेली नाही…’
मेकर्सकडून जारी करण्यात आलेल्या 1 मिनिट 13 सेकंदांच्या व्हिडिओत अजय देवगनचा दमदार आवाज ऐकायला मिळतो. या व्हिडिओत विजय साळगांवकर आपल्या कुटुंबाबद्दल बोलतो आणि आतापर्यंतच्या कथानकाची झलक दाखवली जाते. यात विजय म्हणतो, " जग मला अनेक नावांनी ओळखत, पण मला फरक पडत नाही. मागच्या सात वर्षात जे काही झालं, जे काही केलं, जे पाहिलं, जे दाखवलं यावरून मला एक गोष्ट समजली आहे, जगात प्रत्येकाचं सत्य वेगळं आहे. माझं सत्य फक्त माझं कुटुंब आहे” असं म्हणत तो अजूनही आपल्या कुटुंबासाठी भक्कम भिंत बनून उभा असल्याचं यात अजय म्हणताना दिसतोय. व्हिडिओच्या शेवटी विजय साळगांवकरचं वाक्य प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतं,“कहाणी अजून संपलेली नाही… शेवटचा भाग अजून बाकी आहे.”
कधी प्रदर्शित होणार दृश्यम 3?
‘दृश्यम 3’चं दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार असून हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाच्या संपूर्ण कास्टबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी कथा ‘दृश्यम 2’ जिथे संपली होती तिथूनच पुढे जाणार असल्याचं कळतंय. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, अक्षय खन्नाचा रोल तिसऱ्या भागात दिसणार का? यावर सध्या सस्पेन्स कायम आहे.
मूळ मल्याळम कथेत नसलेला अक्षय खन्नाचा आयजी ऑफिसरचा रोल हिंदी रिमेकमध्ये टाकण्यात आला होता आणि हाच बदल ‘दृष्यम 2’ची सर्वात मोठी ताकद ठरला. दुसऱ्या भागात क्लायमॅक्समधील घडामोडी इतक्या अनपेक्षित आहेत की प्रेक्षकांनी बांधलेले सगळे अंदाज कोलमडून पडतात. पण आता तिसऱ्या भागातही अक्षय खन्ना दिसणार का? हे अजून गुलदस्त्यातच आहे. धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाच्या पात्राकडे चाहत्यांचे विशेष लक्ष राहणार आहे.
मोहनलालच्या ‘दृश्यम’चा हिंदी रीमेक
‘दृश्यम’ हा सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळी चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं होतं. त्यानंतर 2022 मध्ये आलेल्या ‘दृश्यम 2’नेही जबरदस्त कमाई करत लोकप्रियतेचा आलेख उंचावला. आता चार वर्षांनंतर तिसरा भाग येत असून, विशेष म्हणजे मोहनलाल यांनीही मल्याळी ‘दृश्यम 3’चं शूटिंग सुरू केलं आहे. यावेळी मल्याळी मेकर्स हा चित्रपट हिंदीतही रिलीज करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण यावेळी मल्याळी ‘दृश्यम 3’ हिंदीत रिलीज झाल्यास, अजय देवगनच्या ‘दृश्यम 3’च्या कमाईवर त्याचा परिणाम होईल का, कथेत काही बदल पाहायला मिळणार का? हे सगळे प्रश्न आता चर्चेत आहेत. पण विजय साळगांवकरची कहाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार अशी चर्चा सुरुय.