मुंबई : उडता पंजाब, ग्रेट ग्रँड मस्ती, सुलतानसारखे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला होता. हाच प्रकार टाळण्यासाठी 'ढिशूम' चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.


 
जॉन अब्राहम, वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस यांची मुख्य भूमिका असलेला ढिशूम चित्रपट 29 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची एन्क्रिप्टेड कॉपी निर्मात्यांनी सीबीएफसी (केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र महामंडळ)कडे दिली आहे. त्याचप्रमाणे रिलीजपूर्वी सिनेमा लीक होऊ नये यासाठी मुंबई हायकोर्टालाही मध्यस्थीची मागणी केली आहे.

 
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा टेलिकॉम ऑपरेटर्सना ढिशूमचा कुठलाही कन्टेन्ट उपलब्ध करता येणार नाही, अशी मागणी केली आहे. इतकंच नाही, तर या प्रश्नी पंतप्रधानांना लक्ष घालण्याची मागणी करणार असल्याचंही प्रोड्यूसर्स गिल्डचे अध्यक्ष मुकेश भट म्हणाले.

 
प्रमुख हिंदी चित्रपट निर्माते आणि स्टुडिओंच्या प्रमुखांची एक बैठक गेल्या आठवड्यात पार पडली. त्यामध्ये चित्रपटांची पायरसी, ऑनलाईन लीक होण्याच्या समस्येवर चिंता व्यक्त करण्यात आली होती.