Akshay Kumar Priyadarshan : बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपटांचा धुरळा उडवून देणारी अक्षय कुमार (Akshya Kumar) आणि प्रियदर्शन (Priyadarshan) ही जोडी पु्न्हा एकदा एकत्रपणे काम करणार आहेत. जवळपास 14 वर्षानंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शन काम करणार आहेत. प्रियदर्शनने अक्षय कुमारसोबत 'हेरा फेरी', 'भागमभाग', 'भूलभुलैय्या', 'गरम मसाला' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आता जवळपास 14 वर्षानंतर ही जोडी एकत्रपणे काम करणार आहे. अक्षय कुमारचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. त्यामुळे प्रियदर्शन आता अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटांना ब्रेक लावणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
निर्माता-दिग्दर्शक प्रियदर्शने हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. यामध्ये त्याने अक्षय कुमारसोबतच्या आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. प्रियदर्शनने सांगितले की, आतापर्यंत राम मंदिराच्या इतिहासासंबंधी आपण एका डॉक्यू-सीरिजवर काम करत होतो. आता हे काम जवळपास पूर्ण झाले असून आपण लवकरच अक्षय कुमारसोबत काम करणार आहोत.
प्रियदर्शनकडून अक्षय कुमारसोबतच्या चित्रपटावर शिक्कामोर्तब
प्रियदर्शनने आपल्या मुलाखतीत सांगितले की, राम मंदिराच्या इतिहासासंबंधीच्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत होतो. आता हा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. त्यामुळे मी आता अक्षय कुमारसोबतच्या महत्त्वाच्या चित्रपटावर काम सुरू करत आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत आहे. ही एक हॉरर फँटसी फिल्म असणार आहे. यामध्ये ह्युमर आणि कॉमेडी असणार आहे.
'भूलभुलैय्या' सारखा असणार नवा चित्रपट? प्रियदर्शन म्हणतो की...
अक्षयसोबतच्या नव्या चित्रपटाची कथा 'भूल भुलैया'सारखी असेल का, असे विचारले असता, प्रियदर्शनने म्हटले की, 'भूलभुलैय्या चित्रपट हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर होता, पण हा नवा चित्रपट भारतातील सर्वात जुन्या अंधश्रद्धेच्या म्हणजेच काळ्या जादूच्या पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. अक्षयसोबत काम करताना नेहमीच आनंद होतो. आमच्या पहिल्या चित्रपटापासून या चित्रपटापर्यंत सर्व काही त्याच्यासोबत चांगलेच राहिले आहे. तो इमोशन्स चांगल्या प्रकारे हाताळतो. त्याच्यासोबत कमबॅक करण्यासाठी मी एका चांगल्या विषयाची वाट पाहत होतो आणि मला वाटतं हाच विषय असेल, असेही प्रियदर्शनने सांगितले.
'हेरा फेरी-3', 'भूलभुलैय्या-3' वर प्रियदर्शनने काय म्हटले?
सध्या 'भूलभुलैय्या' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे चित्रीकरण सुरू आहे. त्याशिवाय 'हेरा फेरी 3' देखील बनवला जात आहे. प्रियदर्शनला जेव्हा या दोन चित्रपट आणि रिमेकबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने आपण रिमेकच्या बाजूने नाही. चित्रपटाचा पहिलाच भाग सर्वोत्तम असतो. हेराफेरीचा पहिला भाग सर्वोत्तम होता. तुम्ही कोणताही दुसरा किंवा तिसरा भाग बनवला तरीही लोक नेहमी म्हणतील की त्यांना चित्रपटाचा पहिला, मूळ भाग आवडला. सिक्वलमध्ये, निर्माते पहिल्या चित्रपटाच्या बाजारातील यशाचा फायदा घेतात, अर्थात असे करण्यात काहीच गैर नाही. जगभरातील लोक सिक्वेल बनवतात. 'टर्मिनेटर 2' 'टर्मिनेटर 1' पेक्षा मोठा होता. पहिला भाग दुसऱ्याच दिग्दर्शकाने बनवला होता. पण मला सिक्वेल आवडत नाहीत असेही प्रियदर्शने सांगितले.