Dilip Kumar Funeral LIVE Updates : बॉलिवूडचा First Khan काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Jul 2021 05:15 PM
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्र्यांकडून अंत्यदर्शन

 


मुंबई दि 7: ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले. आज सकाळी दिलीपकुमार यांचे निधन झाल्याचे वृत्त समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केली तसेच त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलीपकुमार राहत असलेल्या खार येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शनही घेतले.  यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

युसुफ भाईंच्या जाण्यानं एका युगाचा अंत झाला-भारतरत्न लता मंगेशकर यांची भावूक प्रतिक्रिया  

Dilip Kumar Death News LIVE Updates : 'युसुफ भाईंच्या जाण्यानं एका युगाचा अंत झाला, मला काही सुचत नाहीय, खूप दु:खी आहे, निशब्द झालेय, खूप आठवणी देऊन आपण आम्हाला सोडून गेलात'- भारतरत्न लता मंगेशकर यांची भावूक प्रतिक्रिया  

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या सूचना

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या सूचना

दिलीपकुमार यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान सदैव स्मरणात राहील-सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख 

 


 आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून बॉलिवूडच नाही तर जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान सदैव स्मरणात राहील, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


शोकसंदेशात देशमुख यांनी म्हटले आहे की, १९४४ मध्ये बॉम्बे टॉकिजची निर्मिती असलेल्या 'ज्वार भाटा' चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले, यानंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. आपल्या दर्जेदार अभिनयातून विविध अविस्मरणीय चित्रपट केले, त्यातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. बेस्ट ॲक्टरसाठी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचे रेकॉर्डही दिलीपकुमार यांच्याच नावावर आहे.अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमुना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिलीपकुमार यांनी केवळ अभिनयच केला नाही तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीदेखील केली.

वडीलधाऱ्या स्नेही व्यक्तिला मुकलो-शरद पवार 

 


राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना म्हटलं आहे की, मी वडीलधाऱ्या स्नेही व्यक्तिला मुकलो. अखंड सेवा करण्याचे काम त्यांनी केलं. त्यांना मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो. कुटुंबियांना धीर देण्यासाठी साथ देऊ, असंही पवारांनी म्हटलं आहे. 

रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजरामर भूमिका साकारणारे, दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारतीय चित्रपट सृष्टीच्या लौकिकात भर घालणारी, त्याला सातासमुद्रापार नेणारी अशी दिलीप कुमार यांची कारकिर्द आहे. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नेहमीच्या जगण्यातही त्यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणे  चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवला आणि वाढवला. मेहनतीच्या जोरावर कला क्षेत्रात स्थान निर्माण करता येते, असा संदेश देणारी त्यांची वाटचाल होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा स्नेहबंध होता. कला क्षेत्राविषयीची आत्मियता हा अतूट धागा या दोघांमध्ये होता. अजरामर भूमिका साकारणारे चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामरच राहील. त्यांच्या निधनामुळे रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पुढील अनेक पिढ्यांमध्ये भारतीय सिनेमासाठी दिलेलं त्यांचं योगदान लक्षात ठेवलं जाईल : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी

'माझ्या सद्भावना दिलीप कुमार यांचे कुटुंबिय, मित्र परिवार, चाहत्यांसोबत आहेत. पुढील अनेक पिढ्यांमध्ये भारतीय सिनेमासाठी दिलेलं त्यांचं योगदान लक्षात ठेवलं जाईल', असं म्हणत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

एक मोठा अभिनेता आपल्यातून निघून गेला : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

एक मोठा अभिनेता आपल्यातून निघून गेला, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. 

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सिनेमा,राजकारण यांसारख्या सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'चित्रपट सृष्टीमधील महान व्यक्ती म्हणून दिलीप कुमार यांची कायम आठवण काढली जाईल. दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे. माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबियाबरोबर, मित्रांबरोबर आणि असंख्य प्रशंसकांसोबत आहेत, देव त्यांच्या आत्मास शांती देवो, असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पार्श्वभूमी

Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर येत होती. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 


अनेक दिवसांपासून दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु होते. यापूर्वी 6 जून रोजी देखील दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मुंबईतील खारमधील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डिस्चार्ज देण्याच्या एक दिवस अगोदर एका मायनर सर्जरीमार्फत दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसांत जमा झालेलं पाणी काढण्यात आलं होतं. 5 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर 11 जून रोजी दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. 


बॉलिवूडचा The First Khan काळाच्या पडद्याआड


दिलीप कुमार यांचं पूर्ण नाव मोहम्मद युसूफ खान (Mohammed Yusuf Khan) होतं. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार यांना The First Khan म्हणून ओळखलं जात होतं. हिंदी सिनेसृष्टीतील मेथड अॅक्टिंगचं क्रेडिट दिलीप कुमार यांनाच देण्यात येतं. तसेच त्यांना ट्रॅजिडी किंग म्हणूनही ओळखलं जातं. आपल्या कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी अनेक सिनेमे केले. 1944 साली प्रदर्शित करण्यात आलेला ज्वारभाटा हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट तर 1998 साली प्रदर्शित झालेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.


दिलीप कुमार यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीबाबत सायरा बानो यांचा खुलासा 


एका मुलाखतीत बोलताना सायरा बानो यांनी त्यांच्या आणि दिलीप कुमार यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ज्यावेळी त्या 12 वर्षांच्या होत्या त्यावेळी बॉलिवूड लेजेंड दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यावर त्यांचा जीव जडला होता. त्यानंतर त्यांनी शेवटी दिलीप कुमार यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सायरा बानो यांनी बोलताना दिलीप कुमार आणि त्यांच्या पहिल्या भेटीबाबतही सांगितलं होतं. मुंबईतील महबूब स्टुडियोमध्ये त्या दिलीप कुमार यांना पहिल्यांदा भेल्या होत्या आणि पहिल्या भेटीतच त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.