Dilip Kumar Last Rites: वयाच्या 98 व्या वर्षी जग सोडून जाणारे अभिनेते दिलीपकुमार यांना साश्रू नयनांनी अंतिम निरोप देण्यात आला. तिरंग्यात लपटलेलं दिलीप कुमार यांचं पार्थिव सांताक्रूझ स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. दिलीप कुमार यांना शासकीय इतमामात शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंबच नाही तर उद्योगाशी संबंधित लोकही उपस्थित होते. सायरा बानो शेवटच्या क्षणापर्यंत दिलीपकुमार यांच्या पार्थिवाबरोबर होत्या.


दिलीपकुमार यांनी बुधवारी सकाळी 7.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांच्या शेवटच्या प्रवासामध्ये सामान्य लोकही सहभागी झाले होते. यावेळी बरीच गर्दी दिसून आली. प्रत्येकजण आपल्या आवडत्या अभिनेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी रस्त्यावर आला होता.


स्मशानभूमीअगोदर मशिदीत नेण्यात आले
स्मशानभूमीच्या आधी पार्थिव मशिदीत नेण्यात आले. त्यानंतर त्यांचं पार्थिव सांताक्रूझ स्मशानभूमीत नेण्यात आलं. जिथे त्यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला.


काही दिवसांपासून रुग्णालयात होते भरती
दिलीपकुमार यांची प्रकृती बर्‍याच दिवसांपासून खालावत होती. मात्र, गेल्या एका महिन्यात त्यांना दोनदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारीही त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, यावेळी त्यांना वाचवण्यात अपयश आले.


बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली 
दिलीपकुमार यांच्या मृत्यूची बातमी समजताच प्रत्येकजण त्यांच्या घरी पोहचत होता. शाहरुख खान, करण जोहर, रणबीर कपूर, जॉनी लीव्हर सारखे स्टार त्यांच्या घरी दिसले. शाहरुख खानचे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्याशी खास नाते होते. दोघांनीही नेहमी शाहरुख खानला मुलासारखं वागवलं आहे. म्हणून शाहरुख खानला ही बातमी समजताच तो त्वरित त्यांच्या घरी पोहोचला. सायरा बानो यांना भेटून त्यांचे सांत्वन केले.