Digpal Lanjekar:  प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यांच्या शेर शिवराज, पावनखिंड, सरसेनापती हंबीरराव, फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतीच दिग्पाल यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव 'सुभेदार' (Subhedar) असं आहे. दिग्पाल यांनी सोशल मीडियावर सुभेदार या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन त्यांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली. या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले. पण दिग्पाल यांच्या या चित्रपटाचं पोस्टर पाहून अनेक नेटकऱ्यांना सध्या काही प्रश्न पडत आहेत. 


नेटकऱ्यांना पडले प्रश्न
दिग्पाल यांच्या पोस्टला नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'शेर शिवराज, स्वारी आग्रा येणार होता त्याच काय झालं ?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'सर, स्वारी आग्रा पुढे ढकलला का?' 


दिग्पाल यांच्या पुढील चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेचा थरार दाखवण्यात येईल, असं म्हटलं जात होतं. पण सुभेदार या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर दिग्पाल यांनी त्याच्या चित्रपटाचा विषय बदलला का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 


एका नेटकऱ्यानं कमेंट करुन दिग्पाल यांचं कौतुक केलं आहे. त्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'आग्रा भेटीवर डॉ. कोल्हे यांचा एक सिनेमा येऊन गेलाय त्यामुळे तुमचा हा निर्णय योग्य आहे.. हिंदी तानाजी चित्रपट इतिहासाला धरून नव्हता त्यामुळे या चित्रपटाकडून अपार आशा आहे...'






दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतील 'शिवराज अष्टक' या शिवचरित्रावरील चित्रपट श्रुखंलेला तमाम शिवभक्त आणि रसिकांमध्ये खूपच लोकप्रियता मिळाली. त्यामुळे दिग्पालच्या आगामी चित्रपटात काय पहायला मिळणार? याबाबत सर्वांनाच कुतूहल होतं. नुकतीच ‘सुभेदार’ या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. ‘काळावर नाव कोरणाऱ्या महावीराची महागाथा... 'सुभेदार' अशी या चित्रपटाची अतिशय समर्पक टॅगलाईन आहे. 'सुभेदार' या शीर्षकावरून हा चित्रपट सुभेदार तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा असल्याचं समजतं. त्यानुसार या चित्रपटात तान्हाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे. पोटच्या मुलाचं लग्न बाजूला सारून किल्ले कोंढाण्याच्या शिखरावर स्वराज्याचं विजयी तोरण बांधण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका बलाढ्य योद्ध्याचा रोमहर्षक पराक्रम 'सुभेदार'मध्ये अनुभवायला मिळेल. 


ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या 'सुभेदार' चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर करणार आहेत. प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायण वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, विनोद निशिद जावळकर, शिवभक्त अनिकेत निशिद जावळकर, श्रुती दौंड या चित्रपटाचे निर्माते आहेत. जून 2023 मध्ये 'सुभेदार' चित्रपट रसिक दरबारी सादर होणार आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Sher Shivraj : अफजलखानाच्या वधाचा थरार आता घरबसल्या अनुभवा; 'शेर शिवराज'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर