धनुषच्या शरीरावरील खुणा तपासा, पालकत्वाच्या वादाला नवं वळण
एबीपी माझा वेब टीम | 28 Feb 2017 07:33 PM (IST)
फोटो सौजन्य : द हिंदू
चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता धनुषच्या पालकत्वाच्या वादाने नवीन वळण घेतलं आहे. धनुषच्या शरीरावरील खाणाखुणा तपासण्याचे आदेश मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने दिले आहेत. तामिळनाडूमधील एका वयोवृद्ध जोडप्यानं आपणच धनुषचे खरे आई-वडील असल्याचा दावा केला होता. थिरुप्पुवनम गावातील 65 वर्षीय कथिरेसन आणि 53 वर्षीय मीनाक्षी यांनी धनुष आपला मुलगा असल्याची दावा करणारी याचिका दाखल केली होती. धनुषच्या गळ्याच्या उजव्या बाजुला एक तीळ आहे, तर उजव्या मनगटावर व्रण आहे, असा दावा दाम्पत्याने केला आहे. या दोन्ही जन्मखुणांविषयी शाळा हस्तांतरण दाखल्यात माहिती असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सरकारी डॉक्टरांकडून धनुषच्या शरीरावरील जन्मखुणांची तपासणी झाली. मदुराईतील राजाजी सरकारी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली.