मुंबई : मराठीतल्या सुपरहिट 'सैराट' सिनेमाचा रिमेक 'धडक' सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिला चित्रपट असणाऱ्या कलाकरांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत 'धडक'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'धडक'ने पहिल्या दिवशी 8.71 कोटींची भरघोस कमाई केली आहे.
'स्टुडंट ऑफ द ईयर' सिनेमाने पहिल्या दिवशी 7.48 कोटींची कमाई केली होती. आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राचा हा पहिला सिनेमा होता. मात्र जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरच्या 'धडक'नं 'स्टुडंट ऑफ द ईयर' सिनेमाला कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.
धडक सिनेमाने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातमध्ये चागंली कमाई केली आहे. मात्र दिल्ली, पंजाब आणि मैसूर याठिकाणी सिनेमाला फारशी चांगली ओपनिंग मिळाली नाही. मात्र वीकेंड असल्याने दोन दिवसात कमाईचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची बॉलिवूडमधील एन्ट्री दमदार झाल्याचं यातून स्पष्ट होत आहे. ईशानच्या अभिनयाचं अनेकांकडून कौतूक होत आहे. जान्हवी आणि ईशानची फॅन फॉलोविंग फार नाही, मात्र तरीही कमाईच्या बाबतीत 'स्टुडंट ऑफ द ईयर' मागे टाकण्यात धडकला यश मिळालं आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने धडक सिनमाची निर्मिती केली आहे. शशांक खैतानने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.