मुंबई:  मी भाजपचा प्रवक्ता नाही, पण देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस आहे, असा मुख्यमंत्री आपल्याला हवा आहे, अशी स्तुतीसुमने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उधळली.


मुंबईतील प्रसिद्ध व्हीजेटीआय इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी नानानं त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

असा मुख्यमंत्री हवा

यावेळी नाना म्हणाले, “मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी शिवसेनेचा नाही, भाजपचा नाही. पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस आहे. मी परवा त्यांची मुलाखत पाहत होतो, अगदी शांतपणे आपण राज्यात काय काय केलं, आम्ही कुठे चुकलो, अगदी साध्या सरळ पद्धतीने सांगितलं. यामध्ये काहीही लपवलं नाही.

मी भाजपचा प्रवक्ता नाही, पण असा मुख्यमंत्री आपल्याला हवा आहे, असं मला वाटतं.”

राजकारणी विचार करत नाहीत

लोकांसाठीच आपल्याला काम केलं पाहिजे, असा विचार  राजकारणात येण्यामागे असावा, मात्र आताचे राजकारणी हा विचार कुठे करतात, असा सवाल नानांनी उपस्थित केला.

मी एवढ्या कलाकारात 50 वर्षे कसा टिकलो, तर ते माझ्या चेहऱ्यामुळे नाहीतर तर माझ्या विचारांनी. क्रांतिवीर सिनेमातील हिंदू- मुस्लिम बाबतचा डायलॉग हा विचार होता, तो कधीच संवाद नव्हता, असं नानांनी नमूद केलं.

फेरीवाल्यांची चूक काय?

यावेळी नानांनी फेरीवाल्यांवरही भाष्य केलं. नाना म्हणाले, “मला वाटतं फेरीवाल्यांची यात काहीच चूक नाही. फेरीवाले आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी दोन वेळच्या भाकरीसाठी ते काम करणारच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही.

यामध्ये खरंतर आपली चूक आहे, आपण महापालिकेला, प्रशासनाला इतके दिवस फेरीवाल्यांना जागा का दिली नाही? असं का विचारलं नाही? म्हणजे याला आपणच जबाबदार आहोत. फेरीवाले नाही.”

संबंधित बातम्या

भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर