Dev Anand : देव आनंद (Dev Anand) यांचं नाव सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत घेतलं जातं. जवळपास सहा दशके त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 50-60 च्या दशकातील ते दिग्गज अभिनेते होते. आजही त्यांचे सिनेमे चाहते आवडीने पाहतात.
देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 रोजी पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. देव आनंद यांचे नाव धर्मदेव पिशोरीमल आनंद असे होते. त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही.
देव आनंद यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडल्यानंतर सिनेमात काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते मुंबईत आले. ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त 30 रुपये होते. त्यामुळे दोन वेळचं जेवण आणि राहण्याची सोय करण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले.
देव आनंद यांचे गाजलेले सिनेमे
देव आनंद यांनी सिनेमांसह नाटकातदेखील काम केलं आहे. 'जिद्दी' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं, शहीद लतीफ यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. रोमॅंटिक भूमिकेसाठी देव आनंद ओळखले जात. त्यांचे 'हरे कृष्ण हरे राम', 'गाईड', 'देश-परदेश', 'जॉनी मेरा नाम' असे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. चाहते आजही हे सिनेमे आवडीने पाहतात.
देव आनंद यांना सिनेसृष्टीतील अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. दोन वेळात त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारचा मानाचा पद्मभूषण पुरस्कारदेखील 2001 साली त्यांना मिळाला आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.
देव आनंद यांनी अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही आपली कारकीर्द गाजवली आहे. ते 1954 साली अभिनेत्री कल्पना कार्तिकसोबत लग्नबंधनात अडकले. आपल्या जादुई अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या देव आनंद यांनी 3 डिसेंबर 2011 रोजी जगाचा निरोप घेतला.
देव आनंद यांचे सर्वोत्तम दहा सिनेमे :
- गाईड
- ज्वेल थीफ
- जॉनी मेरा नाम
- तेरे घर के सामने
- तेरे मेरे सपने
- हरे राम हरे कृष्ण
- देस परदेस
- हम दोनो
- वॉरंट
- फंटूश
संबंधित बातम्या