रोम : बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. इटलीतील लेक कोमोच्या काठावर असलेल्या 'विला डेल बालबिअॅनेलो' (villa del balbianello) या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये 'दीपवीर'चा शाही विवाहसोहळा पार पडला.

पारंपरिक कोंकणी पद्धतीने रणवीर आणि दीपिकाचं लग्न झालं. दीपिकाला आवडणाऱ्या वॉटर लिलीच्या फुलांनी लग्नाचा मंडप सजवण्यात आला होता. मंत्रोच्चाराचे आवाज विलाच्या बाहेरही ऐकू येत होते. अद्याप दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आलेले नाहीत.

या विवाह सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रणवीर-दीपिकाचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र असे फक्त 40 जणच या लग्नाला उपस्थित होते. अभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी लग्नाला उपस्थित असल्याची माहिती आहे.

रणवीरची ग्रँड एन्ट्री

लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत आणि मेहंदी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दीपिका आणि रणवीरनेच पाहुण्यांचं स्वागत केलं. शुभा मुदगल यांच्या गायनाने दीपिका भावुक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले, असं म्हटलं जातं. तर रणवीरने 'तुने मारी एन्ट्रिया' गाण्यावर डान्स करत प्रवेश केला. रणवीरने स्वतः ढोल वाजवत संगीत सोहळ्याची शान वाढवली.

रणवीरने गुडघ्यावर बसून दीपिकाचा हात हातात घेतला आणि अंगठी घातली. रणवीर आणि दीपिका उद्या सिंधी पद्धतीने पुन्हा लगीनगाठ बांधणार आहेत. तर 23 नोव्हेंबरला बंगळुरुमध्ये दोघांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. रणवीर-दीपिका 10 नोव्हेंबरला कुटुंबीयांसह इटलीला रवाना झाले होते.

पाच वर्षांची प्रेमकहाणी

रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला : रामलीला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही.

'गोलियों की रासलीला - रामलीला', बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा तीन चित्रपटांमध्ये रणवीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे. सुरुवातीला दोघांनीही आपल्या प्रेमसंबंधांविषयी बोलणं टाळलं होतं, तरीही चाहत्यांनी दोघांच्या लग्नाची अटकळ बांधली होतीच. मात्र 21 ऑक्टोबरला थेट लग्नाची पत्रिका शेअर करत रणवीर-दीपिकाने चर्चांवर शिक्कामोर्तब केलं.

यापूर्वी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीही इटलीतच साता जन्माच्या गाठी बांधल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूडमधलं आणखी एक कपल याच देशात विवाहबंधनात अडकलं.