मागील वर्षी श्रद्धा कपूरचे बरेच चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे सायनासारख्या मोठ्या खेळाडूच्या बायोपिकसाठी श्रद्धासारखी 'फ्लॉप' अभिनेत्रीची निवड फायद्याचं ठरणार नाही, अशी भीती निर्मात्यांच्या मनात आहे. निर्मात्यांना सायनाच्या व्यक्तिरेखेसाठी श्रद्धाऐवजी दीपिका पादूकोणला पाहण्याची इच्छा असल्याचंही समजतं.
श्रद्धा कपूरचे ओके जानू आणि हसीना पारकर गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते. श्रद्धाच्या फ्लॉप चित्रपटांच्या मालिकेने बायोपिकच्या निर्मात्यांना चिंतेत टाकलं आहे. त्यामुळे सध्या त्यांनी सायनाच्या बायोपिकचा प्रोजेक्ट थांबवला आहे.
अमोल गुप्तेच्या दिग्दर्शनात सुरु असलेल्या या सिनेमासाठी श्रद्धाने जोरदार तयारी केली होती. श्रद्धाने बॅडमिंटन अकॅडमीमध्ये जाऊन सायना नेहवाल आणि तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यासोबत बॅडमिंटन कोर्टवर सरावही केला होता. श्रद्धानेही ट्रेनिंगचे फोटो तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले होते. पण आता तिने हे फोटो हटवले आहेत.
मात्र आता या मोठ्या चित्रपटासाठी प्रमुख भूमिकेत एखादी मोठी अभिनेत्री असावी, असं निर्मात्यांना वाटत आहे. सायनाच्या व्यक्तिरेखेसाठी निर्मात्यांना आता दीपिका पादूकोणला साईन करायचं आहे. दीपिकाचे वडील प्रकाश पादूकोण स्वत: एक मोठे बॅडमिंटनपटू होते आणि दीपिकाही राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळली आहे. त्यामुळे दीपिका आता सायनाच्या व्यक्तिरेखेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती बनली आहे. आता सिल्व्हर स्क्रीनवर सायनाच्या व्यक्तिरेखेसाठी दीपिकाला तयार करण्यात निर्मात्यांना यश येतं का हे पाहावं लागेल.