फेसबुकवरील कमेंट्सना कंटाळून गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2016 06:28 AM (IST)
चंदीगड : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह टिप्पणीला कंटाळून हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगणा सपना चौधरीने आत्महत्येचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर चारित्र्याबाबत सुरु असलेल्या थट्टेमुळे नाराज झालेल्या सपनाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सपनाने सहा पानांच्या सुसाईड नोटमध्ये सगळी घटनाही नमूद केली आहे. या सुसाईड नोटमध्ये सपनाने लिहिलं आहे की, "सोशल मीडियावर माझ्याबाबत सुरु असलेल्या चर्चांमुळे मी नाराज आहे. फेसबुकवर मला घाणेरड्या शिव्या दिल्या जात असून अश्लील शब्दात टिप्पणीही सुरु आहे. सपनाने नवाब सतपाल तंवर नावाच्या व्यक्तीवर कट रचल्याचा आरोप केला आहे." सोशल मीडियावरील बदनामीला कंटाळूनच सपना आत्महत्येसाठी प्रवृत्त झाली आणि आज सकाळी नजफगढमधील राहत्या घरी विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. नजफगडच्या एका रुग्णालयात सपनावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं. सपना चौधरी ही हरियाणातील प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगणा असून तिचे लाखो चाहते आहेत. काय आहे प्रकरण? 17 फेब्रुवारी 2016 रोजी गायक सपनाने गुडगावच्या एका गावात रागिनी हे गाणं गायलं होतं, ज्यामुळे प्रचंड वाद झाला होता. रागिनी गाण्यात वापरलेल्या शब्दांवर आक्षेप नोंदवत सतपाल तंवर नावाच्या व्यक्तीने सपनाविरोधात गुडगावच्या सेक्टर 29 मध्ये SC/ST अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर फेसबुकवर सपनाविरोधात एक मोहीमच सुरु झाली होती. सपनाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, या संपूर्ण प्रकरणामागे सतपाल तंवर नावाचा व्यक्ती आहे. सपनाने सुसाईड नोटमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे. पण गुन्हा दाखलपर्यंतच हे प्रकरण राहिलं नाही. सपनाविरोधात सोशल मीडियावर एक मोहीम सुरु करण्यात आली. तिच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. रागिनी हे जुनं गाणं आहे. माझ्याआधी अनेकांनी हे गाणं गायलं आहे. पण मला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात आहे, असा दावा सपनाने केला आहे. सोशल मीडियावर माफी मागूनही अश्लील शब्दातील टिप्पणी थांबली नाही, असं सपनाने सांगितलं.