मुंबई : दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या आगामी उडता पंजाब या सिनेमावरुन पंजाबमध्ये वादळ उठलं आहे. प्रदर्शनाआधीच त्याच्या नावावरुन वाद सुरु झाले आहेत. त्यातच सेन्सॉर बोर्डाने सिनेमामध्ये एक दोन- नव्हे तर तब्बल 89 कटस् सुचवले आहेत. याशिवाय नावातून पंजाब हा शब्दही हटवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


 

निर्माता अनुराग कश्यपचं टीकास्त्र

प्रत्येक चित्रपटाआधी सेन्सॉरच्या जाळ्यात अडकणाऱ्या अनुराग कश्यपचा संयम यावेळी सुटला आहे. त्याच्या आगामी उडता पंजाब चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं चालवलेल्या कात्रीवर तो कमालीचा नाराज झाला आहे.

 

इतका की त्यानं भारताची तुलना थेट उत्तर कोरियाशी केली आहे. सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटात एक दोन- नव्हे तर तब्बल 89 कटस् सुचवले असून, नावातील पंजाब शब्दालाही आक्षेप घेतला आहे.




 

त्यावर चिडलेल्या अनुरागनं ट्विट करताना भारत म्हणजे उत्तर कोरिया बनत असल्याची जळजळीत टीका केली आहे. त्याच्या या टीकेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यानं माझं वक्तव्य केवळ सेन्सॉरबोर्डाच्या कारभाराशी निगडीत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

शाहीद कपूर, करिना आणि आलिया भटची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पंजाबमधील अंमली पदार्थाच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाईवर आधारलेला आहे. त्यातील पंजाबच्या संदर्भाला सेन्सॉर बोर्डानं जोरदार आक्षेप घेतला आहे.