Chitra Navathe: आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे (Chitra Navathe) यांचे बुधवारी (11 जानेवारी) सकाळी निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड (Mulund) येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ (Santacruz) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चित्रा नवाथे (Chitra Navathe Passed Away) यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
चित्रा नवाथे यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले. त्यांनी 1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाखाची गोष्ट’ (Lakhachi Gosht) या चित्रपटात पहिल्यांदाच प्रमुख भूमिका साकारली. राजा परांजपे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. राजा गोसावी, चित्रा यांची बहीण रेखा कामत (Rekha Kamat), शरद तळवलकर (Sharad Talwalkar) या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रा आणि रेखा कामत या दोन बहिणींनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती.
वयाच्या 78 व्या वर्षी चित्रा नवाथे यांनी 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या टिंग्या (Tingya) चित्रपटात भूमिका साकारली. वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती (Gulacha Ganapati), बोलविता धनी, उमज पडेल तर, राम राम पाव्हणं, मोहित्यांची मंजुळा (Mohityanchi Manjula),अगडबम (Agadbam) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या बोक्या सातबंडे (Bokya Satbande) या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलं.
अभिनेत्री चित्रा नवाथे यांनी चित्रपटाबरोबरच नाटकांमध्ये देखील काम केले. लग्नानंतर लग्नाची बेडी आणि तुझं आहे तुझपाशी (Tuz Ahe Tuz Pashi) या नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. स्मिता तळवलकर दिग्दर्शित तू तिथे मी (Tu Tithe Mee) या 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून चित्रा नवाथे यांनी काम केले. चित्रा नवाथे यांचा विवाह निर्माते, दिग्दर्शक दिवंगत राजा नवाथे यांच्याशी झाला होता. चित्रा नवाथे यांचे नाव कुसुम नवाथे (Kusum Navathe) असे होते पण ग. दि. माडगूळकर (Gajanan Digambar Madgulkar) यांनी त्यांचे नाव चित्रा असे नाव ठेवले होते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: