Chinmay Mandlekar : मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) सध्या 'सुभेदार' (Subhedar) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात त्याने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची भूमिका साकारली आहे. महाराजांची भूमिका साकारताना चिन्मय नेमकी काय तयारी करतो? कोणत्या नियमांचे पालन करतो याचा खुलासा त्याने नुकतचं एका मुलाखतीत केला आहे.


मीडिया टॉक मराठी या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत चिन्मय मांडलेकर म्हणाला,"मी खूप नियम पाळतो. शिवरायांच्या पूर्ण पोशाखामध्ये असताना, जेव्हा मी जिरेटोपही चढवतो, त्यानंतर तुम्हाला माझा एकही सेल्फी कोणाबरोबरही मिळणार नाही. अगदी देशाचा पंतप्रधान जरी आला तरीही नाही. याचं कारण असेल जेव्हा तो पूर्ण पोशाख मी घालतो तेव्हा मी छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत असतो. तो मान राखला गेला पाहिजे".


छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पोशाख केला की त्यांचा आब राखला गेला पाहिजे : चिन्मय मांडलेकर


चिन्मय पुढे म्हणाला,"त्यामुळे मी आजपर्यंत त्या पोशाखात कोणालाही फोटो दिलेला नाही. बऱ्याचदा लोकांचा हिरमोड होतो. मात्र मी तरीही त्यांना सांगतो की समजून घ्या माझी तळमळ, पण मी तुम्हाला सेल्फी नाही देणार. माझा नियम एकच आहे की एकदा का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पोशाख केला की त्यांचा आब राखला गेला पाहिजे."


"जेव्हा प्रत्यक्ष लोकेशनवर शूटिंग सुरु असते, तेव्हा अनेक लोक तुम्हाला भेटायला किंवा शूट पाहायला येतात. अशावेळी त्या पोशाखाचा आणि महाराजांचा सन्मान करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे एकदा त्या भूमिकेत गेल्यावर मी सेटवर कोणतीही गोष्ट करताना मर्यादा आणि तारतम्य बाळगतो. कारण, महाराजांचा सन्मान राखणे महत्त्वाचे असते", असे चिन्मय मांडलेकर म्हणाला.


‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलरला लाखोंची पसंती 


दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ सिनेमाद्वारे प्रेक्षकांना पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर,  समीर धर्माधिकारी,  अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर, शिवानी रांगोळे,नूपुर दैठणकर,  भूषण शिवतरे, श्रीकांत प्रभाकर,  बिपीन सुर्वे, अलका कुबल, विराजस कुलकर्णी,  अजिंक्य ननावरे,  मृण्मयी देशपांडे, दिग्पाल लांजेकर, आस्ताद काळे, पूर्णानंद वाडेकर आदि मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरला लाखोंनी पसंती दर्शवली आहे. येत्या 18 ऑगस्टला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


संबंधित बातम्या


Subhedar Trailer: 'सुभेदार' चित्रपटाच्या ट्रेलरला दोन दिवसात दोन मिलियपेक्षा अधिक व्ह्यूज; चिन्मय मांडलेकरनं शेअर केली खास पोस्ट