जयपूर : राजस्थान उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला 1998 मधील जोधपूरच्या काळवीट शिकार प्रकारणात दोन्ही खटल्यांमधून निर्दोष मुक्त केले होते. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राजस्थान सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

 

राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याचे संसदीय कार्य आणि विधीमंत्री राजेंद्र राठोड यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. सलमान खान प्रकरणात राज्य सरकारने सर्व निकालपत्राची पडताळणी केल्यानंतर, या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले.

 

सलमान विरोधात भवाद आणि मथानिया येथे काळवीट शिकार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने 25 जुलै रोजी सुनावणी करताना, सलमानची निर्दोष मुक्तता केली होती.

 

सलमानने 26/27 सप्टेंबर 1998 रोजी भवादमध्ये आणि 28/29 सप्टेंबर रोजी मथानियामध्ये काळवीट शिकार प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियमचे कलम 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सलमान खानला दोन्ही प्रकरणी दोषी ठरवून १७ फेब्रुवारी २००६ रोजी एक वर्ष तर १० एप्रिल २००६ रोजी पाच वर्षांसाठी कारवासाची शिक्षा सुनावली होती.