Samrat Prithviraj : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट आज (3 जून) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या दिल्लीतील स्पेशल स्क्रीनिंगला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) हजेरी लावणार आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर अभिनीत या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासह मोहन भागवत देखील उपस्थित राहणार आहेत.
यशराज फिल्म्सचा पहिला ऐतिहासिक चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ निर्भयी आणि पराक्रमी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आणि पराक्रमावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार महान योद्धा ‘सम्राट पृथ्वीराज’ यांची भूमिका साकारत आहे. सम्राट पृथ्वीराज यांच्या धैर्याने आणि नेतृत्वाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.
हा आमचा सन्मान : अक्षय कुमार
मोहन भागवतजी हा ऐतिहासिक चित्रपट पाहणार आहेत, हा आमचा सन्मान आहे. आपल्या भारतमातेची एक इंचही भूमी न देण्याचा निर्णय घेतलेल्या गौरवशाली राजाचा सन्मान करणारा हा चित्रपट आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही आमच्या प्रामाणिक चित्रपटाद्वारे सर्वांचे मनोरंजन करू, असे अक्षय कुमार म्हणाला.
प्रत्येक भारतीयासाठी एक उदाहरण!
दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणतात, ‘सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे जीवन प्रत्येक भारतीयासाठी एक उदाहरण आहे. जेव्हा शत्रू आपल्या मातृभूमीवर आक्रमण करण्यासाठी आले, तेव्हा ते खंबीरपणे उभे राहिले आणि शत्रूंना परतवून लावले. आम्हाला भारत मजबूत करायचा आहे आणि मला आशा आहे की, आमचा चित्रपट सर्वांना प्रेरणा देईल.
मानुषी छिल्लरचे पदार्पण
माजी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर, अक्षय कुमारच्या या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ‘सम्राट पृथ्वीराज’बद्दल सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे, ते पाहता अक्षयचा हा चित्रपट फारच कमाई करू शकेल असे वाटते आहे.
संबंधित बातम्या