मुंबई : सध्या मराठी चित्रपटाला थिएटर मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागत आहे. सिम्बा आणि भाई यांचा वाद ताजा असताना मराठी मनाला सुखावणारी बाब घडली आहे. येत्या 25 जानेवारीला अभिजीत पानसे दिग्दर्शित 'ठाकरे' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या शौमिक सेन दिग्दर्शित 'चिट इंडिया' चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आज संध्याकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात ही घोषणा होणार आहे.


ही पत्रकार परिषद 'चिट इंडिया'ची असली तरी त्या व्यासपीठावर खासदार व ठाकरे चित्रपटाचे निर्माते संजय राऊत व आदित्य ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात ही अधिकृत घोषणा होईल.

मिळालेल्या माहितीनुसार 'ठाकरे' चित्रपटाबाबत असलेली उत्सुकता पाहता बहुचर्चित मणिकर्णिका हा चित्रपटही आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 25  जानेवारीला 'ठाकरे' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याच दिवशी कंगना राणावतचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी' आणि 'चिट इंडिया' या दोन चित्रपटांचा समावेश आहे. मात्र ‘ठाकरे’साठी 'चिट इंडिया'  चित्रपटाची तारीख पुढे ढकलली असून 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी' या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती. ‘ठाकरे चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे, या तारखेला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली आहे. 25 जानेवारीला अन्य चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ , असेही त्यांनी म्हटले होते. मात्र ही शिवसेनेची भूमिका नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 'ठाकरे' व्यतिरिक्त 25 जानेवारीला दुसरा कोणताही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. लोक उत्साहाने, प्रेमाने मत व्यक्त करत आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं.

काय म्हणाले होते बाळा लोकरे?

'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर लॉन्सनंतर बाळा लोकरे यांची फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. येत्या 25 जानेवारीला 'ठाकरे' सिनेमाव्यतिरिक्त कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकी वजा इशारा बाळा लोकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.

त्यानंतर लोकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी इतर कोणताही चित्रपट आम्ही चालू देणार नाही. जर कुणी इतर चित्रपट प्रदर्शित करणार असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची ही इच्छा असल्याने आम्ही यावर ठाम आहोत, असं बाळा लोकरे यांनी सांगितलं होतं.