मुंबई : एकीकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारीत सिनेमासाठी सेन्सॉर बोर्डानं निर्मात्यांना मनमोहन सिंहांकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आणण्यास सांगितलं आहे. तर दुसरीकडे इंदिरा गांधींच्या जीवनावर आधारीत सिनेमासाठी सिनेमा दिग्दर्शक मधुर भांडारकरला दिलासा दिला आहे.

कारण सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सिनेमाचं ट्रेलर पाहून अतिशय आनंदी आहेत. तसेच त्यांनी या सिनेमासाठी काँग्रेस किंवा गांधी घराण्यातील सदस्यांकडून ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.

निहलानी म्हणाले की, ''मी मधुर भांडरकरच्या सिनेमाचं ट्रेलर पाहिला. त्याने भारतीय राजकारणातील एका काळ्या अध्यायावरचा पडदा दूर केला आहे. याबद्दल मी त्याचे आभार मानतो. हा एक असा काळ होता, ज्यावेळी जगासमोर देशाची मान खाली गेली होती. आणीबाणीच्या काळात आपल्या देशातील अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.''

त्यांना वास्तविक घटना, किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तीच्या जीवनावर आधारीत सिनेमासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' गरजेचं असल्याच्या नियमाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, ''इंदु सरकार सिनेमात कुणाचंही नाव घेण्यात आलं नाही. ट्रेलरमध्ये इंदिरा गांधी, संजय गांधी किंवा इतर कुणाचाही उल्लेख नाही. तुम्ही ज्यांचा उल्लेख करता, त्यांचा सिनेमातील पात्रांच्या वेशभूषेमुळे करत आहात.''

निहलानी पुढे म्हणाले की, ''मी ट्रेलरमध्ये कोणाचंही नाव ऐकलं नाही. जर त्यांनी सिनेमात याचा उल्लेख केल्यास, त्यावेळी आम्ही संपूर्ण सिनेमा पाहू. सध्या तरी एका तरी दिग्दर्शकाने आणीबाणीवर सिनेमा बनवल्याबद्दल मला आनंद होत आहे. हा आपल्या भारतीय राजकारणातला काळा अध्याय होता.''

दरम्यान, या सिनेमाचं ट्रेलर नुकतंच लॉच करण्यात आलं. यावेळी अभिनेते अनुपम खेर, नील नितीन मुकेश, मधुर भांडारकर यांच्या उपस्थितीत होते. नील नितीन मुकेश या सिनेमात दिवंगत काँग्रेस नेते संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

आणीबाणीच्या काळात नागरिकांना झालेला त्रास आणि देशातील आणीबाणीची परिस्थिती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होईल.

सिनेमाचा ट्रेलर पाहा