अहमदाबाद : पटेल आंदोलनाचा प्रमुख हार्दिक पटेलवर आधारित गुजराती चित्रपटाची वाट सेन्सॉर बोर्डाने अडवली आहे. चित्रपटात संबंधित व्यक्तिरेखांची खरी नावं वापरल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शनाला संमती नाकारली आहे.

 
'पॉवर ऑफ पाटिदार' हा चित्रपट सीबीएफसीकडे प्रमाणपत्रासाठी पाठवण्यात आला होता. सेन्सॉर कमिटीने शुक्रवारी मुंबईत हा सिनेमा पाहिला आणि त्यानंतर निर्मात्यांना हा निर्णय कळवला.  कुठलेही कट्स किंवा बदल सुचवण्याऐवजी निर्माते दीपक सोनींना चित्रपटाला प्रमाणपत्रच मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं, अशी खंत चित्रपटाशी संबंधित व्यक्तींनी बोलून दाखवली आहे.

 
ओबीसी दर्जा मिळवण्यासाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्वात सुरु असलेल्या पाटिदार अनामत आंदोलन समिती (पास) च्या सर्व नेत्यांची नाव जशीच्या तशी वापरल्याने सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. त्याचप्रमाणे गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नावं वापरण्यावरही बोर्डाने हरकत घेतली आहे.

 
नोकऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात पाटिदार समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हार्दिक पटेलने छेडलेल्या आंदोलनावर हा चित्रपट आधारित आहे. हार्दिक पटेलला काहीच दिवसांपूर्वी जेलमधून सोडण्यात आलं होतं.