मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघींमध्ये सुरु असलेली कॅट फाईट आता संपलीय असंच या फोटोवरुन दिसतं आहे.


'अ जंटलमन' या सिनेमाच्या निमित्ताने जॅकलिन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीची खूपच चर्चा रंगली. जॅकलिन आणि आलिया यांच्यात सिद्धार्थ मल्होत्रावरुन मतभेद निर्माण झाले होते. इतकंच नाही तर सिद्धार्थ आणि आलियाच्या ब्रेकअपचं कारणही जॅकलिन असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर दोघींमध्ये धुसफूस असल्याच्या बातम्या येत होत्या.

परंतु अनिल कपूर यांनी दिवाळीनिमित्त मुंबईत दिलेल्या पार्टीत आलिया आणि जॅकलिन भेटल्या. एवढंच नाही तर आलिया गालावर किस करत असल्याचा फोटो स्वत: जॅकलिनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे आता जॅकलीन आणि आलियाच्या या फोटोमुळे सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.