Brahmastra : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलाकार सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच आता चित्रपटाचा एक मोठा प्रमोशनल इव्हेंट रद्द करण्यात आला. हैदराबादमधील रामोजी राव स्टुडिओमध्ये मोठ्या संख्येने चाहत्यांच्या उपस्थितीत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा भव्य नृत्य आणि संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जो पोलिसांनी सुरक्षा संबंधित परवानग्या नाकरल्यामुळे रद्द करावा लागला. या शोमध्ये विशेष पाहुणे म्हणून रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर (Karan Johar), मौनी रॉय (Mouni Roy), नागार्जुन (Nagarjuna) यांच्याशिवाय ‘आरआरआर’ फेम अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) आणि दिग्दर्शक एस.एस. राजामौलीही (SS Rajamouli) उपस्थित राहणार होते.


हैदराबादमधील स्थानिक तणावामुळे आणि गणपतीच्या मंडळांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने, या शो संबंधित परवानगी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर हैदराबादमधील पार्क हयात हॉटेलमध्ये चित्रपटाशी संबंधित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये रणबीर, आलिया, नागार्जुन, मौनी, चित्रपटाचा निर्माता करण जोहर याशिवाय ज्युनियर एनटीआर, एसएस राजामौली आदींनी हजेरी लावली होती.


चित्रपट पाहण्याचे आवाहन


‘ब्रह्मास्त्र’चा हा शो रद्द झाल्याने एसएस राजमौली यांनी नाराजी व्यक्त केली. राजामौली यांनी 'ब्रह्मास्त्र' सारखा अनोखा चित्रपट बनवून भारतीय चित्रपटसृष्टीला एका नव्या उंचीवर नेल्याबद्दल दिग्दर्शक अयान मुखर्जीचे कौतुक केले आणि प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन केले. यावेळी राजामौली यांनी लोकांना साऊथ आणि हिंदी चित्रपटांमध्ये भेदभाव न करण्याचे आवाहन केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिमानाचा एक क्षण म्हणून ‘ब्रह्मास्त्र’सारखा वेगळ्या प्रकारचा चित्रपट पाहावा, असे ते म्हणाले.


कलाकारांनी शेअर केले अनुभव


यावेळी प्रमोशनमध्ये सहभागी झालेल्या ज्युनियर एनटीआरने आपण अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता असल्याचे म्हटले. चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या नागार्जुनने 'ब्रह्मास्त्र'मध्ये काम करतानाचे आपले अनुभव शेअर केले. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मौनी रॉय यावेळी म्हणाली की, या चित्रपटात काम करतानाचे अनुभव ती कधीच विसरू शकणार नाही आणि अशा चित्रपटात काम करणे हे तिच्यासाठी स्वप्नपूर्तीसारखे आहे. करण जोहर म्हणाला की, ‘मी या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. अयान मुखर्जीची ही कल्पनाशक्ती, मेहनत आणि उत्कटता पडद्यावर साकार व्हावी अशी माझी इच्छा आहे’.


यावेळी आलिया म्हणाली की, चित्रपट बनवण्याच्या 10 वर्षांच्या या प्रवासाचे वर्णन असे 10 मिनिटांत करता येणार नाही. प्रत्येकाने हा चित्रपट बनवण्यात प्रचंड मेहनत घेतली आहे. रणबीर कपूरने सांगितले की, अयान मुखर्जीने अशा वेळी त्याच्यासोबत 'ब्रह्मास्त्र' बनवण्याचे स्वप्न पाहिले होते, जेव्हा त्याची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु देखील झाली नव्हती.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Brahmastra : जबरदस्त अॅक्शन अन् बिग बींचा खास लूक; ब्रह्मास्त्रचा नवा टीझर रिलीज