Box Office Collection First 100 Crore Movie :   सिनेइंडस्ट्रीत साधारणपणे 2010 नंतर कोणत्याही चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केल्यास त्या चित्रपटाला हिट अथवा त्या पुढील वर्डिक्ट दिले जाते. सध्या चित्रपटांसाठी 100 कोटींची कमाई करणे फारसं आव्हानात्मक राहिले नाही. मात्र, 100 कोटींची कमाई करणे याचा विचार चार दशकांपूर्वी कोणी केलाही नसेल. 


सध्या एखादा चित्रपट रिलीज झाला आणि त्याला प्रतिसाद मिळू लागला की हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये जाईल का यावर चर्चा सुरू होते.  बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा 100 कोटींची कमाई करणारा चित्रपट हा अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा होता. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डिस्को डान्सर' या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'डिस्को डान्सर' चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. 


'डिस्को डान्सर'चा बॉक्स ऑफिस कलेक्शन


आय एम अ डिस्को डान्सर, जिम्मी जिम्मी आजा आजा, याद आ रहा है...तेरा प्यार यासारख्या गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटामुळे मिथुन चक्रवर्तीचे बॉलिवूडमधील स्थान बळकट झाले. 


Sacnilk च्या माहितीनुसार, 'डिस्को डान्सर' या चित्रपटाचे बजेट 2 कोटी रुपये होते. तर बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे जागतिक कलेक्शन 100 कोटी रुपये होते. यासह हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील 100 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला होता. हा चित्रपटाचा सर्वात मोठा विक्रम होता आणि त्याच वेळी या चित्रपटाला किंवा त्यातील गाण्यांना केवळ भारतातच लोकप्रियता मिळाली नाही तर परदेशातही या चित्रपटाच्या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळाला. 


'डिस्को डान्सर'ची टीम कशी होती?


बब्बर सुभाष यांनी फक्त 'डिस्को डान्सर' या चित्रपटाची निर्मितीच केली नाही तर त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. 'डिस्को डान्सर' या चित्रपटात मिथुन चक्रवर्तीची मुख्य भूमिका होती. तर कल्पना अय्यर, हीता सिद्धार्थ, मास्टर छोटू, ओम पुरी यांसारखे कलाकारही या चित्रपटात दिसले होते.


या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली. डिस्को डान्सरमधील गाण्यांना बाप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केली होती. त्याशिवाय, बाप्पी लाहिरी आणि उषा उथुप यांनी चित्रपटातील जवळपास सगळी गाणी गायली होती. सध्या हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. 


'डिस्को डान्सर'ची गोष्ट काय?


डिस्को डान्सर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अनिलच्या (मिथुन चक्रवर्ती) मार्गात गरिबीचा वारंवार अडथळा येतो. एका घटनेत त्याच्या आईवर चोरीचा आळ घालण्यात येतो आणि तिची रवानगी  तुरुंगात करण्यात येते. अनेक वर्षांनंतर अनिलचे स्वप्न पू्र्ण होते आणि स्वप्न पूर्ण झाल्यावर त्याने आईचा गमावलेला मानसन्मान पुन्हा कमावतो.


मात्र, हे सर्व करताना त्याची लोकप्रियताच त्याची शत्रू होते. या चित्रपटाने मिथुनची लोकप्रियता  शिगेला पोहचली होती. मिथुनला चाहत्यांनी 'डिस्को डान्सर' म्हणून उपाधी दिली.