लगे रहो मुन्ना भाई' या चित्रपटातील बटूक महाराज हे पात्र आपल्या सगळ्यांना नक्कीच आठवत असेल. या चित्रपटात कुलभूषण खरबंदा यांनी साकारलेल्या मिस्टर खुराना या उद्योगपतींचे ते ज्योतिषी असतात. या बटूक महाराजांनी सांगितल्या प्रमाणे खुराना यांनी आपल्या आडनावाच्या शब्द्लेखनात म्हणजेच स्पेलिंगमध्ये काही बदल केलेले असतात. Khurana या शब्दात ते आणखी एक K लावत KKhurana करतात. परंतु क्लायमॅक्सनंतर मात्र ते हा अधिकचा K काढून टाकतात.


ही झाली फिल्मची कहाणी. पण बॉलीवूडमध्ये अशी अनेक मंडळी आहेत ज्यांनी आपल्या नावाच्या किंवा आडनावाच्या स्पेलिंगमध्ये ज्योतिषबुवांच्या सल्ल्यानुसार बदल केले आहेत. पाहूयात पाच असे बॉलीवूड कलाकार ज्यांनी गेल्या काही वर्षात आपल्या स्पेलिंगमध्ये बदल केले आहेत;


आयुष्मान खुराना : 
आयुष्मान खुरानाची खरी स्पेलिंग ही Ayushman Khurana अशी होती, परंतु नंतर त्याने आयुष्मान या नावात एक अधिक N तर खुरानामध्ये अधिकचा R वापरण्यास सुरुवात केली. या बद्दल बोलताना आयुष्मानने सांगितलं की आपण ज्योतिशास्त्राला मनात नाही, परंतु वडिलांच्या सांगण्यानुसार हा बदल केला आहे.



तुषार कपूर : 
तुषार कपूर म्हटलं की आठवते ती गोलमाल चित्रपटाची सिरीज. एकही शब्द न बोलता तुषार ने आपल्या अभिनयाचा दर्जा जगाला दाखवला आणि लोकांनी ही त्याला खूप उचलून धरले. अर्थात तुषार एक उमदा कलाकार आहेच परंतु त्याला हवं तसं यश प्राप्त झालं नाही. त्याने सुद्धा नावात बदल करून पाहिला पण त्याच्या आयुष्यात ज्योतिष शास्त्रही अपयशी ठरलं. तुषारने Tushar या स्पेलिंग मध्ये अजून एक Sचा वापर करत Tusshar असं केलं आहे.



अजय देवगण : 
अजय देवगण आपल्या आडनावाची स्पेलिंग Devgn अशी लिहितो तर काजोल Devgan असं लिहिते. एकाच छताखाली राहूनसुध्दा हे दोघे स्पेलिंग मात्र वेगवेगळी लिहितात. 2009 साली अजयने आपल्या आडनावाच्या शब्द्लेखानात बदल केले. त्या आधी त्याचे चित्रपटांच्या सेट्सवर काही किरकोळ अपघात झाले होते. परंतु आपल्या आईच्या सांगण्यावरून अजयने आपल्या आडनावातून A हे अक्षर वगळले आणि त्यानंतर त्याला यश मिळत गेलं. नंतरच्या काळात एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट अजयने प्रेक्षकांना दिले आहेत.



सुनील शेट्टी : 
सुनील शेट्टी म्हणजेच बॉलीवूडच्या अण्णा...सुनील हा मुळातच एक उद्योगपती आहे. अभियन करणे हे त्याचे उपजिविकेचे साधन नसून त्याचे सुरुवातीच्या काळापासूनच अनेक बिजनेस आहेत. 90 च्या दशकात सुनील शेट्टीचे अनेक सिनेमे गाजले, अॅक्शन म्हटलं की सुनील असणारच, परंतु नंतरच्या काळात त्याला चित्रपट मिळणं कठीण झालं आणि त्याने आपल्या उद्योगधंद्यावर जास्त भर दिला. काहीच वर्षापूर्वी सुनीलने आपल्या नावात E हे अक्षर वाढवलं आहे. त्यामुळे Sunil ची स्पेलिंग Suniel अशी झाली आहे. आता हे बदल चित्रपटांसाठी केले आहेत की उद्योगधंद्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.



जावेद जाफरी : 
जावेद जाफरी म्हटलं तर तरूण पिढीला आठवतील ते Takeshi's Castleचे दिवस. जावेदने त्या शोसाठी आपला आवाज देत चिमुकल्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होत. त्यानंतर त्याच्या जजंतरम ममंतरम ने सुद्धा प्रेक्षकांवर जादू केली होती. पण याच जावेदच्या स्पेलिंगचा घोळ हा फारच क्लिष्ट आहे. जावेदची खरी स्पेलिंग ही Javed Jaffrey अशी होती. परंतु कालांतराने त्याने तीच स्वरूप बदललं आणि Javed मध्ये दोन A तर  Jaffrey मध्ये F आणि E अक्षर वगळत अधिकचा A लावला आणि काही इतर अक्षरांची प्लेसमेंट बदलली. Jaffrey चं Jaafery असं झालं. आता कदाचित परत त्याने आपल्या आडनावाची स्पेलिंगमध्ये बदल केले असावे कारण ट्विटरवर त्याच्या आडनावात Y अक्षराची जागाI अक्षरा ने घेतली आहे.



असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या नावाच्या शब्द्लेखानात किंवा स्पेलिंगमध्ये बदल केले आहेत. परंतु आम्ही आता तरी या पाच मंडळींची आपल्याला माहिती दिली आहे. इंग्रजी भाषेतील प्रसिध्द प्रसिद्ध कवी आणि नाटककार William Shakespeare एकेकाळी म्हणाला होता की नावात काय आहे? परंतु आता नावातचं सगळं काही आहे असं दिसून येतंय.