नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत राजपूत आणि कृति सेनन यांचा अपकमिंग 'राबता' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ट्रेलर पाहून सिनेमातील कृति आणि सुशांत यांच्या अभिनयाची सर्वत्रच चर्चा रंगली. पण या ट्रेलरमध्ये असाही एक अभिनेता आहे, ज्याला कुणीही ओळखलं नाही. कारण 32 वर्षांच्या या तरण्याबांड अभिनेत्याला चक्क 324 वर्षांचा वृद्ध दाखवण्यात आलं आहे.

'क्वीन' आणि 'ट्रॅप्ड' आदी सिनेमांमधील आपल्या दमदार अभिनयाने राजकुमार रावने साऱ्यांचेच लक्ष वेधलं होतं. पण 'राबता' सिनेमात 32 वर्षीय अभिनेत्याला 324 वर्षांचा वृद्ध व्यक्ती दाखवण्यात आलं आहे.

याबाबत सिनेदिग्दर्शक दिनेश विजान यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, ''32 वर्षांच्या राजकुमारला 324 वर्षांचा वृद्ध दाखवणं अतिशय अवघड होतं. ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याला मेकअप आणि तयार होण्यासाठी बराच वेळ द्यावा लागणार होता. पण राजकुमारने ते केलं. प्रोस्थेटिक मेकअपच्या मदतीनं त्याचं रुपच पालटलं होतं. त्याला कुणीही ओळखू शकत नव्हतं.''


''या व्यक्तीरेखेसाठी मेकअपचा फायनल लूक निवडण्यापूर्वी जवळपास 16 प्रकारच्या मेकअप लूक टेस्ट कराव्या लागत होत्या. तसेच हा मेकअप करण्यासाठी लॉस एंजेल्सहून मेकअप अर्टिस्टची टीम आणावी लागली. शिवाय ही व्यक्तीरेखा साकारण्यासाठी  राजकुमारने आपल्या आवाजवरही भरपूर मेहनत घेतली,'' असल्याचं दिनेश विजान यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे या व्यक्तीरेखेबद्दल अभिनेता राजकुमार म्हणाला की, ''एका अभिनेत्यासाठी हे सर्व अतिशय मजेशीर असतं. दिनेश यांचा एक दिग्दर्शक म्हणून दृष्टीकोन स्पष्ट होता. या प्रकारच्या मेकअपसाठी 4 ते 5 तास वेळ द्यावा लागतो. शिवाय घामानं अक्षरश: मी निथळून निघत होतो. त्यामुळे मला यासाठी माझ्या मनावर खूप नियंत्रण ठेवावं लागत होतं.''

या सिनेमाचं ट्रेलर सोमवारी रिलीज झालं असून, कृति आणि सुशांत यांची प्रेककथा वेगवेगळ्या काळातील दाखवली गेली आहे. हा सिनेमा 9 जून रोजी रिलीज होणार आहे.

सिनेमाचा ट्रेलर पाहा