Sholay Girl Reshma Pathan :

  सध्या बॉलिवूडमध्ये अॅक्शनपटांची सध्या चलती आहे. अभिनेत्यांच्या अॅक्शनपटात आता अभिनेत्रीदेखील महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. अभिनेत्रींनादेखील अॅक्शन सीन करावे लागत आहेत. दीपिका पदुकोण, कतरिना कैफ सारख्या अभिनेत्री कोणताही बॉडी डबल न वापरता स्वत: अॅक्शन सीन देतात. मात्र, काही दशकांपूर्वी काही अभिनेत्रींनीदेखील अॅक्शन सीन दिले आहेत. पण, त्यांच्यासाठी बॉडी डबल वापरण्यात आले. 


हिंदी चित्रपटांमध्ये अनेक सीन्समध्ये बॉडी डबल वापरले जातात. अभिनेता, अभिनेत्रींऐवजी हे बॉडी डबल कलाकार स्टंट, अॅक्शन सीन्स करायचे. सिनेइंडस्ट्रीत रेश्मा पठाण या अभिनेत्रींच्या बॉडी डबल म्हणून काम करायचे. रेश्मा पठाण यांनी शोले सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले आहे. मात्र, रेश्मा पठाण सध्या कुठे आहे, त्या काय करतात, त्यांनी स्टंटवुमन म्हणून आपला प्रवास कसा सुरू केला, त्यांना भारतीय सिनेइंडस्ट्रीमधील पहिली स्टंटवुमन का म्हणतात, हे जाणून घेऊयात...


कोण आहे रेश्मा पठाण?






भारतात जन्मलेल्या रेश्मा पठाणने वयाच्या 14 व्या वर्षी घोडेस्वारीसह अशा अनेक गोष्टी करायला सुरुवात केली, जी त्या काळातील महिलांसाठी जवळजवळ अशक्य होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर रेश्मा पठाणने इंडस्ट्रीत स्थान निर्माण केले. तबस्सुम टॉकीजच्या एका व्हिडिओमध्ये रेश्मा पठाणने सांगितले होते की, तिला झाशीची राणी, रजिया सुलताना यांसारख्या अनेक महिलांकडून प्रेरणा मिळाली आहे.


भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा रेश्मा पठाण यांच्यावर चांगलाच प्रभाव राहिला होता. मध्यमवर्गीय कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या रेश्मा यांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची होती. मात्र, इतर महिला करतात, त्या कामापेक्षा काही थोडं हटके काम करण्याची इच्छा रेश्मा यांची होती. स्टंट म्हणून त्यांनी काही गोष्टी शिकून घेतल्या. 


रेश्मा पठाण यांनी करिअरची सुरुवात कशी केली?


रेश्मा या 14 वर्षांच्या असताना त्यावेळी फाइट डायरेक्टर एस अजीम यांनी सिनेसृष्टीत काम करण्यास सुचवले. रेश्मा यांनी 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एक खिलाडी बावन पत्ते' या चित्रपटात अभिनेत्री लक्ष्मी छायाचा बॉडी डबल म्हणून काम केले होते. रेश्मा यांनी तबस्सुमसोबतच्या मुलाखतीत सांगितले की, त्यांना पहिल्या कामासाठी एका दिवसाचे 175 रुपये मिळाले होते. यातील 100 रुपयांची बचत करायच्या आणि 75 रुपये प्रवास आणि इतर गोष्टींसाठी खर्च होत असे.


रेश्मा यांना मोठं यश शोलेच्या माध्यमातून मिळाले. 1975 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात रेश्मा यांनी हेमा मालिनी यांच्या बॉडी डबलची भूमिका साकारली होती. त्याशिवाय, रेश्मा यांनी श्रीदेवी, डिंपल कपाडिया, रेखा, वहिदा रेहमान आणि मीनाक्षी शेषाद्री यांची बॉडी डबल म्हणून काम केले. रेश्मा पठाण यांनी भोजपुरी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले. रेश्मा पठाण या सत्तर-ऐंशीच्या दशकात सिनेइंडस्ट्रीत खूपच सक्रिय राहिल्या. वाढत्या वयानुसार त्यांनी हे काम करणे बंद केले. 






रेश्मा पठाण यांचे वैयक्तिक आयुष्य


वर्ष 1980 मध्ये रेश्मा पठाण यांनी स्टंट डायरेक्टर शकूर पठाण यांच्यासोबत लग्न केले. रेश्मा पठाण यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक काम केले असून भारतीय सिनेसृ्ष्टीत पहिली स्टंटवुमन म्हणून त्यांना ओळखले जाते. 'कौन बनेगा करोडपती' मधील एका एपिसोडमध्ये 'शोले'चे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि अभिनेत्री हेमा मालिनी सहभागी झाले होते. त्यावेळी रेश्मा पठाण यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.