मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनच्या तपासादरम्यान एनसीबीच्या मुंबई युनिटने अभिनेता अर्जुन रामपालच्या घरात छापा टाकला होता. आता एनसीबीच्या या छाप्याबाबत अर्जुन रामपालने मोठा दावा केला आहे. या छाप्यादरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कुत्र्याची वेदनाशामक औषधं आणि बिहिणीची एन्झायटीची औषधं जप्त केली होती, असं अर्जुन रामपालने सांगितलं आहे. एनसीबी अनेक महिन्यापासून बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाचा तपास करत आहे. या दरम्यान अर्जुन रामपालवर एनसीबीची नजर गेली. यामुळे अर्जुन रामपालची दोन वेळा एनसीबीच्या कार्यालयात चौकशीही झाली.


एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, "अर्जुन रामपालने सांगितलं की त्याच्या घरात ज्या दोन प्रकारच्या गोळ्या सापडल्या आहेत, त्यापैकी एक गोळी कुत्र्याची असून जी वेटनरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली होती. तर दुसरी गोळी बहिणीची आहे. दिल्लीतील एका मानसोपचारतज्ज्ञांनी तिच्या एन्झायटीबाबत ही गोळी दिली होती."


"ज्या संशयाच्या आधारे मला चौकशीसाठी बोलवलं होतं तो संशयच बिनबुडाचा आहे," असंही अर्जुन रामपालने आपल्या जबाबात म्हटलं.


सुरुवातीपासून काय घडलं त्यावर एक नजर....


एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेण्डचा भाऊ अॅगिसियालोस डेमीट्रिएड्सला अटक केल्यानंतर एनसीबीने जेव्हा त्याचा मोबाईल तपासला असता त्याचे अर्जुन नावाच्या व्यक्तीसोबतचे काही चॅट्स सापडले होते. त्या चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख होता. मग 9 नोव्हेंबरला एनसीबीच्या पथकाने अर्जुन रामपालच्या वांद्र्यातील कॅप्री हाईट्स इथल्या घरात छापा मारला.


अनेक तासांच्या छाप्यात एनसीबीला त्याच्या घरात दोन प्रकारच्या टॅबलेट्स सापडल्या. पहिल्या गोळीचं नाव 'ULTRACET'होतं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच ही गोळी घेता येते. ही गोळी 'TRAMADOL' (ISIS ड्रग्ज नावानेही ओळखलं जातं ) आणि ACETAMINOPH दोन प्रकारच्या ड्रग्जने बनवली जाते. 'ULTFACET' च्या एका पॅकेटमध्ये एकूण 15 गोळ्या असतात. एनसीबीला त्या पॅकेटमध्ये उरलेल्या चारच गोळ्या सापडल्या होत्या. दुसरी टॅबलेट जी अर्जुन रामपालच्या घरातून जप्त करण्यात आली होती तिचं नाव 'CLONAZEPAM' आहे. ही गोळी पॅनिक अटॅक आणि एन्झायटीच्या समस्येवर घेतली जाते. एनसीबीला या गोळीचे दोन पॅकेट्स सापडले होते.


अॅगिसियालोस आणि अर्जुन नावाच्या व्यक्तीमध्ये झालेल्या व्हॉट्सअॅप चॅट वाचल्यानंतर ज्या गोष्टी सापडण्याचा संशय एनसीबीला होता ते काहीच सापडल नाही. दरम्यान या गोळ्या एनडीपीएसच्या कलमांतर्गत येतात, जर डॉक्टराचं प्रिस्क्रिप्शन नसेल.


अर्जुन रामपालच्या घरात छापा टाकल्यानंतर एनसीबीने त्याची गर्लफ्रेण्ड गॅब्रिएलाची 11 आणि 12 नोव्हेंबरला चौकशी केली. 13 नोव्हेंबरला एनसीबीने बरीच तयारी केली होती. त्याच्या आणि अगिसियालोस यांच्यात झालेल्या चॅटबाबत विचारणा एनसीबी करणार होती. त्या दिवशी अर्जुन रामपाल एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचला. एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी त्याला ते चॅट दाखवले. अर्जुन रामपालला काही प्रश्न विचारायच्या आधीच तो म्हणाला की, "चॅटमधील अर्जुन मी नाही आणि मी अगिसियालोससोबत दररोज एवढं बोलत नाही." यानंतर एनसीबीने तो नंबर तपासला. यानंतर अर्जुन रामपाल खरं बोलत असल्याचं स्पष्ट झालं.


यानंतर एनसीबीने दोन गोळ्यांच्या बाबतीत चौकशी केली. त्यावर तो म्हणाला की, "एक (ULTRACET) गोळी कुत्र्याची आहे, जी मुंबईतील एका वेटनरी डॉक्टरने दिली होती. तर दुसरी (CLONAZEPAM) गोळी त्याच्या बहिणची असून दिल्लीच्या रोहित गर्ग नावाच्या डॉक्टरने दिली होती." यानंतर एनसीबीने त्या प्रिस्क्रिप्शनचा तपास केला. वांद्र्यातील वेटनरी डॉक्टरचा जबाब नोंदवण्यात आला, ज्यात डॉक्टरने एनसीबीला सांगितलं की, "हे औषध अर्जुन रामपालच्या कुत्र्याला जून महिन्यात दिलं होतं. त्याच्या कुत्र्याच्या सांध्यांमध्ये वेदना होतात आणि तेव्हा त्याला खूप वेदना होतात. यानंतर त्याला औषधांची गरज पडते."


तपासात हे देखील समोर आलं की, "दुसऱ्या गोळीचं प्रिस्क्रिप्शन अर्जुन रामपालने मागील तारखेचं बनवलं होतं." याचा पुरावे एनसीबीला दिल्लीतील मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर रोहित गर्ग यांच्या जबाबानंतर मिळाले. यानंतर एनसीबीने 21 नोव्हेंबरला अर्जुन रामपालला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. यावेळी त्याला बॅकडेटेड प्रिस्क्रिप्शनबाबत विचारणा करण्यात आली. यावर तो म्हणाला की, "हे औषध आपलं नाही तर बहिणीचं आहे आणि याबाबत आपल्याला कल्पना नाही." एनसीबीने अद्याप अर्जुन रामपालच्या बहिणीची चौकशी केलेली नाही.


एपीबी न्यूजशी बोलताना एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, "छाप्यानंतरच औषधाची बॅकडेटेड प्रिस्क्रिप्सन बनवलं आहे. यावर आम्ही काय आणि कशाप्रकारे पुढील कायदेशीर कारवाई करु शकतो, यासंदर्भात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत."