Tanuja Hospitalised: दिग्गज अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील (Mumbai News) जुहू (Juhu) येथील रुग्णालयात तनुजा यांना दाखल करण्यात आलं आहे. तनुजा यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तनुजा यांना बरं वाटत नसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु, नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती खालावली
80 वर्षीय अभिनेत्री तनुजा सध्या रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवलं जात आहे. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. दिग्गज अभिनेत्री तनुजा म्हणजे, बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री काजोल देवगणची आई.
काजोलची आई आयसीयूमध्ये दाखल
चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांची कन्या तनुजा म्हणजेच, दिग्गज अभिनेत्री तनुजा. तनुजा यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. तनुजानं चित्रपट निर्माता शोमू मुखर्जीसोबत लग्न केलं. त्यांना काजोल आणि तनिषा मुखर्जी या दोन मुली आहेत. दोन्हीही चित्रपटसृष्टीतील मोठी नावं. काजोलची कारकीर्द खूप यशस्वी आहे. पण, तनिषाला मात्र तितकी लाईमलाईट मिळू शकली नाही. सध्या तनिषा 'झलक दिखला जा 11' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. प्रत्येक वीकेंडला धमाकेदार परफॉर्मन्स देऊन ती प्रेक्षकांची तसेच जजची मनं जिंकत आहे. या प्लॅटफॉर्मवर तनिषानं तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टीही शेअर केल्या आहेत, ज्या चाहत्यांमध्ये सध्या चर्चेत आहेत.
अभिनेत्रीनं 'हमारी बेटी' (1950) मधून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात ती तिची मोठी बहीण नूतनसोबत दिसल्या होत्या. या चित्रपटात तनुजा बालकलाकाराच्या भूमिकेत दिसल्या. यानंतर 1961 मध्ये तनुजा 'हमरी याद आएगी' या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून दिसल्या. नंतर ती 'ज्वेल थीफ', 'बहारें फिर भी आएंगी', 'पैसा या प्यार', 'हाथी मेरे साथी' आणि 'मेरे जीवन साथी'मध्ये दिसल्या.
अभिनेत्री तनुजा यांनी 80 च्या दशकात रुपेरी पडदा गाजवला. त्यांनी अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तनुजा दिग्गज अभिनेत्री शोभना समर्थ आणि निर्माता कुमारसेन समर्थ यांची मुलगी आहे. दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री नूतन यांची बहिण.
तनुजा यांचा जन्म 23 सप्टेंबर 1943 रोजी झाला होता. या अभिनेत्रीनं लहान वयातच आपल्या अभिनयानं सर्वांना चकित केलं. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तनुजाचा पहिला चित्रपट 'छबिली' (1960) रिलीज झाला आणि त्यानंतर ती 1962 मध्ये आलेल्या 'मेम दीदी' चित्रपटात त्या दिसल्या.