Satish Kaushik Family: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधाननं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका असं कुटुंब आहे. सतीश हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. सतीश यांना वैयक्तिक आयुष्यात संकटांना सामोरं जावं लागलं होतं. 


1985 मध्ये सतीश कौशिक यांनी शशी कौशिक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर शशी आणि सतीश यांच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन झालं. त्यांनी आपल्या मुलाचं नाव शानू असं ठेवलं. शानूच्या जन्मानंतर सतीश हे कुटुंबासोबत वेळ घालवत होते. पण सतीश यांचा मुलगा शानूचं वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी निधन झाले. मुलाच्या निधनानंतर सतीश हे खचले होते. 


वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये सतीश आणि शशी हे सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. सतीश आणि शशी यांनी त्यांच्या मुलीचं नाव वंशिका असं ठेवलं. सतीश हे सोशल मीडियावर त्यांचे कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत होते. आता सतीश यांच्या निधनानं कौशिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 






सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 


सतीश कौशिक हे अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणामध्ये झाला. त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी नाटकांमध्ये काम केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया चित्रपटामुळे त्यांनी विशेष ओळख मिळाली. तसेच दीवाना मस्ताना, राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 


सतीश कौशिक यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली. अनुपम खेर यांनी ट्वीट शेअर करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Satish Kaushik Passes Away: मिस्टर इंडिया ते राम लखन; हिट चित्रपटांमध्ये सतीश कौशिक यांनी केलं काम, प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता हरपला