John Abraham : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याच्या 'अटॅक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी जॉन प्रभाससोबत 'सालार' या तेलगू चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता या बातमीवर जॉनने मोठे वक्तव्य केले आहे.
बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच साऊथच्या चित्रपटांचीही सध्या प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांनाही आपल्या आवडत्या अभिनेत्याला साऊथच्या चित्रपटांमध्ये पाहण्याची इच्छा आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही साऊथच्या चित्रपटांनी प्रभावित आहेत. साऊथचे अनेक सिनेमे महराष्ट्रातही हिट होत आहेत. परंतु, बॉलिवूडचे चित्रपट साऊथमध्ये जास्त चालत नसल्यावरून अभिनेता सलमानने आश्चर्य व्यक्त केले होते. परंतु, या बाबतीत जॉनची विचारसरणी इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. एका मुलाखतीदरम्यान तो त्याच्या आगामी चित्रपटाप्रमाणे अटॅक मुडमध्ये दिसला. तो म्हणाला, 'मी कधीच प्रादेशिक सिनेमा करणार नाही. मी हिंदी चित्रपटाचा हिरो आहे. फक्त चित्रपटाचा भाग होण्यासाठी मी काही सेकंद लीडची भूमिका करणार नाही. फक्त व्यवसायात टिकून राहण्यासाठी मी इतर कलाकारांप्रमाणे प्रादेशिक चित्रपटांचा भाग बनणार नाही.
अलिकडच्या काळात अनेक बॉलिवूड स्टार्स साऊथ सिनेमांमध्ये दिसत आहेत. यामध्ये आलिया भट्ट, संजय दत्त यांसारख्या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. इतकंच नाही तर लवकरच सलमान खान साऊथचा मेगास्टार चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’ या चित्रपटातही खास भूमिका करताना दिसणार आहे.
दरम्यान, जॉन सध्या अटॅक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जॉन व्यतिरिक्त रकुल प्रीत सिंग, जॅकलीन फर्नांडिस, प्रकाश राज आणि रत्ना पाठक शाह हे कलाकार यात दिसणार आहेत. हा चित्रपट उद्या म्हणजेच 1 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
महत्वाच्या बातम्या