मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन झालं. वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. परंतु काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज ते मृत्यूझी झुंज हरले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
चित्रपट निर्माते शूजित सरकार यांनी इरफान खान यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्वीट करुन इरफान खान यांचं निधन झाल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं आहे की, "माझा प्रिय मित्र इरफा... तू लढलास. मला तुझा अभिमान आहे. आपण पुन्हा भेटू. स्तुपा आणि बाबिल यांचं सांत्वन.. तुम्ही सुद्धा लढलात. या लढाईत तू शक्य तेवढं केलंस. तुझ्या आत्म्याला शांती मिळो...इरफान खान सलाम."
इरफान खान यांनी 16 मार्च 2018 मध्ये आपल्या आजाराविषयी खुलासा केला होता. "मला 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' झाल्याचे समजले. सध्या तरी कठीण झाले आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचे प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला उपचारांसाठी परदेशात जावे लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो," असं इरफान खान यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर आजारावरील उपचारांसाठी ते परदेशात गेले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर दहा महिन्यांनी इरफान खान मायदेशी परतले होते. आपल्या आजारातून सावरत त्यांनी 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले होते.
पानसिंह तोमर, पिकू, बिल्लू, तलवार, द लंच बॉक्स, मकबूल, हिंदी मीडियम यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांसह अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं होतं. अंग्रेजी मीडियम हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.