मुंबई : टेलिव्हिजन क्षेत्रापासून करिअरची सुरवात करणारे अभिनेते इरफान खान यांनी बॉलिवूड आणि हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. इरफान खान यांनी मकबूल, लाइफ इन अ मेट्रो, रोग, स्लमडॉग मिलेनियर, हिंदी मीडियम यांसारखे एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांना दिले. हॉलिवूड चित्रपट ए माइटी हार्ट, स्लमडॉग मिलियनेयर, द अमेजिंग स्पाइडर मॅनसह जुरासिक पार्कमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. इरफान यांना 'पान सिंह तोमर' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. एवढचं नाहीतर भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं. दरम्यान, अंग्रेजी मीडियम हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे.


इरफान खानचा जन्म 7 जानेवारी 1967 मध्ये जयपूर येथे झाला होता. एका मुस्लिम पठाण कुटुंबात जन्मलेल्या इरफानचं पूर्ण नाव शाहबजादे इरफान अली खान असं आहे. इरफानने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं. इरफानने आपल्या करिअरच्या सुरुवातीला चाणक्‍य, भारत एक खोज, चंद्रकांता यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर 'सलाम बाम्‍बे' या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अनेक चित्रपटांमध्ये त्याने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. पण इरफानला 'मकबूल', 'रोग', 'लाइफ इन अ मेट्रो', 'स्‍लमडॉग मिलेनियर', 'पान सिंह तोमर', 'द लंचबाक्‍स' यांसारख्या चित्रपटांमुळे सिनेसृष्टीत वेगळी ओळख मिळाली होती.


पाहा व्हिडीओ : इरफान खान यांचा जीवन परिचय



इरफान खानने 16 मार्च 2018 मध्ये आपल्या आजाराविषयी खुलासा केला होता. 'मला 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' झाल्याचे समजले. सध्या तरी कठीण झाले आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचे प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला उपचारांसाठी परदेशात जावे लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो.' असं इरफान खान यांनी म्हटलं होतं.


त्यानंतर ते या आजारावर उपचार घेण्यासाठी लंडनला गेले होते. दहा महिन्यांनी इरफान उपचार पूर्ण करुन मायदेशी परतला होता. आपल्या आजारातून सावरत 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाचे चित्रीकरणही केले होते. दरम्यान, वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात इरफान खान यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. चित्रपट निर्माते शूजित सरकार यांनी इरफान खान यांच्या निधनाची बातमी दिली.


संबंधित बातम्या : 


Irrfan Khan | प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं निधन

Coronavirus | कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढणारा इरफान खान मजूरांसाठी करणार 'हे' काम