नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतेच इटलीमध्ये गुपचूप विवाहबंधनात आडकले. यानंतर इलियाना डी क्रूझ या बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचूप लग्न केल्याची चर्चा होती. त्यातच भर पडली आहे, ती म्हणजे ‘पार्च्ड’ आणि ‘हेट स्टोरी-2’ फेम अभिनेत्री सुरवीन चावलाची. सुरवीने सोशल मीडियावर आपल्या बॉयफ्रेण्डसोबतचे फोटो शेअर करुन लग्न केल्याची माहिती चाहत्यांना दिली.

इंस्टाग्रामवर आपल्या बॉयफ्रेण्डसोबतचे लॉन्ग डिस्टेंस डान्स पोजमधील फोटो शेअर करताना सुरवीनने लिहिलंय की, “एक साधारण आयुष्य जगत असताना, माझी कहाणी एखाद्या परीपेक्षा कमी नाही.” दरम्यान, एका इंग्रजी वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, सुरवीने दोन वर्षापूर्वीच लग्न केलं होतं.


सूत्रांच्या माहितीनुसार, सुरवीन आणि अक्षयची 2013 मध्ये एक कॉमन फ्रेण्डमुळे भेट झाली. यानंतर लगेचच ते दोघेही प्रेमात पडले. दोघांनी 2015 मध्ये लग्न केलं. पण याची माहिती केवळ त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनाच होती.

वास्तविक, सुरवीनने टीव्ही जगतातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2003 ते 2007 दरम्यान ‘कही तो होगा’ या मालिकेतून तिने पदार्पण केलं. तसेच एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘काजल’ आदी मालिकांमध्येही काम केलं आहे. अनिल कपूर सोबतच्या ‘24’ या मालिकेत तिने शेवटचे काम केलं.

यानंतर 2011 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘हम तुम शबाना’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. यानंतर अनेक कन्नड, पंजाबी, तेलगू सिनेमातूनही तिने प्रमुख भूमिका साकारली. सुरवीनला ‘हेट स्टोरी-2’ सिनेमासाठी पहिला लीड रोल मिळाला. तर ‘पार्च्ड’ सिनेमातील तिची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली.

संबंधित बातम्या


इलियाना डी क्रूझचं बॉयफ्रेण्डसोबत गुपचूप लग्न?


विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!