मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतनंतर आता अभिनेता सोनू सूद मुंबई महापालिकेच्या निशाण्यावर आहे. कारण बीएमसीने सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोनू सूदने जुहूमधील सहा मजली राहिवाशी इमारतीत आवश्यक परवानगीशिवाय अनधिकृत हॉटेल सुरु केल्याचा ठपका बीएमसीने ठेवला आहे. एमआरटीपी कायद्याअंतर्गत सोनू सूदविरोधात तक्रार दाखल करावी, असं बीएमसीने जुहू पोलिसांना सांगितलं आहे.


बीएमसीने चार जानेवारी रोजी जुहू पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "जुहूच्या एबी नायर रस्त्यावर असलेली शक्ती सागर इमारत या रहिवासी इमारतीत कोणत्याही आवश्यक परवानगीशिवाय हॉटेल सुरु केलं आहे. असे निदर्शनास आलं आहे की, सोनू सूद यांनी इमारतीचा काही भाग वाढवल्याचा, बदल केल्याचा आणि वापरात बदल केला आहे.


दरम्यान या प्रकरणी सोनू सूदनेही प्रतिक्रिया दिली आहे. "इमारतीमधील बदलासाठी आपण महापालिकेकडे यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे. आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून (एमसीझेडएमए) मंजुरीसाठी थांबलं होतं," असं सोनू सूदने म्हटलं आहे.


कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊदरम्यान गरिबांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू सूदने अपार मेहनत घेतली होती. गरिबांसाठी तो जणू मसिहाच ठरला होता. परंतु तेव्हा मदतीसाठी चर्चेत असणाऱ्या सोनूची यावेळी मात्र चुकीच्या कारणांमुळे चर्चा आहे.


BMC filed police complaint against Sonu Sood | अभिनेता सोनू सूदविरोधात पालिकेची पोलिसांत तक्रार