Bhausaheb Shinde Govardhan Marathi Hindi Movie :  राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेत सिनेसृष्टीत दाखल झालेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) आता हिंदी रुपेरी पडदा गाजवण्यास सज्ज झाला आहे. 'बबन' आणि 'रौंदळ'नंतर भाऊसाहेब पुन्हा एकदा अॅक्शन रुपात झळकणार आहे. भाऊसाहेब शिंदेची मुख्य भूमिका असलेल्या 'गोवर्धन' या ( Govardhan Marathi Hindi Movie) चित्रपटाची घोषणा करण्यात आली. 


'बबन' या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेबचं 'रौंदळ' चित्रपटामधील अॅक्शन भूमिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. आता भाऊसाहेबची मुख्य भूमिका असलेल्या 'गोवर्धन' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट मराठी-हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. 


भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंट या बॅनरअंतर्गत बाळासाहेब शिंदे आणि प्रमोद भास्कर चौधरी यांनी 'गोवर्धन' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राईज बिझनेस ग्रुप चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'रौंदळ' या बहुचर्चित चित्रपटानंतर भाऊसाहेबचा 'गोवर्धन' हा आगामी अ‍ॅक्शनपटही मराठीसह हिंदीतही बनवण्यात येणार असून दिग्दर्शक गजानन नाना पडोळ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. गजानन नाना पडोळ यांनी यापूर्वी 'रौंदळ'चे  दिग्दर्शन केले होते. '


भाऊसाहेब शिंदे म्हणाला, हा चित्रपट म्हणजे...


'गोवर्धन'बाबत भाऊसाहेब म्हणाला की, या चित्रपटात पुन्हा एकदा अॅक्शन रूपात दिसणार असलो तरी हा विषय खूप वेगळा आणि संवेदनशील आहे. तुमच्या आमच्या रोजच्या सामाजिक जीवनातील मुद्दे या चित्रपटात मोठ्या धाडसाने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भाऊसाहेबने सांगितले. देशातील भयाण वास्तव रुपेरी पडद्यावर सादर करत समाजाला आरसा दाखवण्याचं कामही हा चित्रपट करेल यात शंका नाही. हिंदू धर्मात गायीला माता मानली जाते. तिच्या ठायी तेहतीस कोटी देवांचं वास करत असल्याचं मानलं जातं. त्याच गोमातेच्या रक्षणार्थ उभ्या ठाकलेल्या नायकाची कथा 'गोवर्धन'मध्ये आहे. या निमित्ताने समाजातील इतरही मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं भाऊसाहेबने सांगितले.


चित्रपटाच्या पोस्टरमध्ये काय?




गोवर्धन' या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरवर गोवर्धनच्या भूमिकेत भाऊसाहेब दिसणार असल्याचं लिहिलं आहे. पोस्टरवरील भाऊचा अँग्री यंग मॅनसारखा लूक लक्ष वेधून घेत आहे. भाऊसाहेबने नेहमीच आपल्या मातीतील सिनेमे बनवण्याला प्राधान्य दिलं आहे. 'गोवर्धन' हा चित्रपटही त्याला अपवाद नसणार अशी चर्चा आहे. या चित्रपटात भाऊसाहेबचे गायी-वासरांचं रक्षण करणाऱ्या 'गोवर्धन'चं रूप पाहायला मिळणार आहे. वासराला पाठीला बांधून खलनायकाला धडा शिकवण्याासाठी सज्ज झालेला नायक 'गोवर्धन'च्या पोस्टरवर दिसतो. रक्तानं माखलेला शर्ट, कपाळाला टिळा आणि जखम, वाढलेली दाढी-मिशी, पाठीला बांधलेलं गायीचं वासरू, डाव्या हातात शस्त्र असा 'गोवर्धन'चा लूक पोस्टरवर पाहायला मिळतो. याखेरीज दोन गायीसुद्धा पोस्टरवर आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या विषयावरून चर्चा सुरू झाली आहे.