मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व पु.ल. देशपांडे यांचा बायोपिक असलेला ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा दुसरा भाग फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'पुरष्या', 'पुरुषोत्तम' आणि 'भाई'चा पु.ल. देशपांडे होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

पु.ल. देशपांडेंचा बायोपिक दोन अडीच तासांमध्ये होऊच शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची दोन भागांमध्ये निर्मिती केली आहे. 4 जानेवारी 2019 रोजी चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट हिट झाला आहे. आता महेश मांजरेकर या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येत आहेत. 8 फेब्रुवारी 2019 रोजी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागात पुलंचे बालपण पहायला मिळाले. तसेच शाळा महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी, लग्न आणि अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास पहायला मिळाला. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पुलंचे साहित्य, नाट्य क्षेत्रातील आभिनेता आणि लेखक म्हणून योगदान, आकाशवाणीमधली नोकरी, सामाजिक क्षेत्रातील सहभाग ते उतारवयातील प्रवास अशा पुलंच्या विविध भूमिका पहायला मिळणार आहेत.