मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार, कथा आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. त्यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीत अनेक पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले आहे. अनेक मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्यांना नामांकनं मिळाली आहेत. याच जावेद अख्तरांनी एक विक्रमदेखील प्रस्थापित केला आहे.


एखाद्या सिने, नाट्य पुरस्कार सोहळ्यात एकाच व्यक्तीला, एकाच विभागात एकापेक्षा जास्तवेळा नामांकनं मिळाल्याचे आपण पाहिले आहे. परंतु एकाच विभागातली पाचही नामांकनं एकाच व्यक्तीला मिळाल्याचे कधी ऐकले/पाहिले नसेल. परंतु अशी गोष्ट एकदा घडली आहे. तेही प्रसिद्ध फिल्पफेअर पुरस्कार सोहळ्यात.

2005 सालच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट गीतकार या विभागात जावेद अख्तर यांना पाचही नामांकनं मिळाली होती. हा एक विक्रमच आहे.

Filmfare Awards 2005
सर्वोत्कृष्ट गीतकार विभाग
नामांकनं
1. जावेद अख्तर - मैं हूं ना (मैं हूं ना)
2. जावेद अख्तर - ये तारा वो तारा (स्वदेस)
3. जावेद अख्तर - ऐसा देस है मेरा (वीर झारा)
4. जावेद अख्तर - मैं यहा हूं (वीर झारा)
5. जावेद अख्तर - तेरे लिये हम है जिये (वीर झारा)

पाचही नामांकनं जावेद अख्तर यांनाच मिळाली होती. केवळ फिल्मफेअरच नाही, कुठल्याही पुरस्कार सोहळ्यांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले होते.

पुरस्कारांची घोषणा करण्यापूर्वी जावेद साहेबांना सन्मानाने स्टेजवर नेण्यात आले. तेरे लिये गाण्यासाठी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मदन मोहन यांनी रचलेल्या चालींवर जावेद साहेबांनी गाणी लिहिली होती. अर्थात आधी कपडे शिवून तयार होते, त्या मापाचे बाळ आणले गेले!

अख्तर यांच्या लेखणीतून एक सो एक डायलॉग्ज आणि गाणी उतरली आहेत. ते 'घर से निकलते ही...' पण लिहितात आणि 'जश्न ए बहारा' पण! 'पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद ना इन्हे रोके' किंवा 'संदेसे आते है...' सुद्धा त्यांच्याच लेखणीतून अवतरलंय. त्याचवेळी 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'सारखं गीतदेखील अख्तरांनी लिहून ठेवलंय. अशा या हरहुन्नरी गीतकाराला पंचाहत्तरीतील पदार्पणानिमित्त वंदन