Bastar The Naxal Story Trailer :   'द केरल स्टोरी' या चित्रपटानंतर आता मोठ्या पडद्यावर नक्षलवादी चळवळीचा हिंसक चेहरा दिसणार आहे. 'द केरल  स्टोरी'नंतर (The Kerala Story) निर्माते विपुल शाह, दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) यांच्या 'बस्तर: द नक्षल स्टोरी' (Bastar: The Naxal Story) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या ट्रेलरमध्ये नक्षलवादी चळवळीच्या हिंसाचाराला लक्ष्य करण्यात आले असून शहरी नक्षलवादालाही अधोरेखित करण्यात आले आहे. बस्तरसारख्या ठिकाणी नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करणाऱ्या सुरक्षा दलाच्या संघर्षाभोवती चित्रपटाची कथा आहे.


या चित्रपटाच्या टीझरमध्ये आक्रमक भाषा वापरण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटात नक्षली चळवळीविरोधात आक्रमक चित्रण असणार असा कयास होता. हा अंदाज पूर्ण करणारा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 


अदा शर्मा अॅक्शन भूमिकेत


सुदिप्तो सेनच्या दिग्दर्शनात निर्मिती झालेल्या बस्तर: द नक्सल स्टोरी या चित्रपटाचा दोन मिनिट 35 सेकंदांचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अदा शर्मा ही अॅक्शन भूमिकेत दिसत आहे. नक्षलवादी चळवळीशी दोन हात करणाऱ्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत अदा शर्मा दिसणार आहे. 


जवानांच्या हत्याकांडाने ट्रेलरची सुरुवात 


या ट्रेलरच्या सुरुवातीला हिंसाचाराची काही दृष्ये आहेत आणि पार्श्वभूमीवर आयसिस आणि बोको हराम यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची दहशतवादी संघटना भारतात माओवादी असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर ट्रेलरमध्ये नक्षलवाद्यांकडून सीआरपीएफच्या जवानावर नक्षलवादी हल्ला करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर एका विद्यापीठात जवानांच्या हत्येचा आनंद साजरा करताना दाखवण्यात आले आहे. आदिवासींवर हल्ले, पोलीस, जवान, राजकीय नेत्यांच्या हत्या, नक्षलवाद्यांसोबत चकमक, त्यांचा एन्काउंटर अशी दृश्ये 'बस्तर'च्या ट्रेलरमध्ये आहे.






देशात नक्षलवाद्यांकडून 15 हजारांहून जवानांच्या हत्या


चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अदा शर्माच्या तोंडी काही महत्त्वाचे संवाद आहेत. पाकिस्तानसोबतच्या युद्धात 8738 जवानांची हत्या झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे देशातच नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 15 हजारांहून अधिक जवानांची हत्या झाली असल्याचा संवाद आहे.  


 इतर संबंधित बातमी: