Aditi Dravid On Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या सिनेमाची गोष्ट, कथा, कलाकारांचा अभिनय आणि गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातील 'मंगळागौर' हे गाणं मराठमोळी अभिनेत्री आदिती द्रविडने (Aditi Dravid) लिहिलं आहे. 


आदिती द्रविडने लिहिलेलं 'मंगळागौर' हे गाणं चांगलच गाजत आहे. या गाण्याला युट्यूबवर 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात 'बाईपण भारी देवा' सिनेमातील सर्व अभिनेत्री मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसत आहेत. आदिती द्रविडने लिहिलेलं हे गाणं लोकप्रिय गायिका सावनी रवींद्रने गायलं आहे.


'बाईपण भारी देवा'च्या यशात अभिनेत्री आदिती द्रविडचा मोलाचा वाटा आहे. याबद्दल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली,"बाईपण भारी देवा' सारखी कलाकृती नेहमी होत नाही आणि मला अशा अफाट कलाकृतीचा मी एक भाग आहे याचा मला प्रचंड आनंद आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेमाला मिळणारं यश पाहून नक्कीच आनंद होत आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्याचं काम केलं आहे". 


आदिती द्रविड पुढे म्हणाली,"बाईपण भारी देवा' या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक साई पियूष यांनी मला गाणं लिहिण्याबद्दल विचारलं तेव्हा एका क्षणात मी त्यांना होकार दिला. या सिनेमाची गोष्ट खूप अप्रतिम बांधली गेली आहे. तसेच तगडी स्टारकास्ट आहे. मंगळागौरबद्दलचं गाणं लिहिणं हा माझ्यासाठी खूप मजेशीर टास्क होता. मंगळागौरीची गाणी, ओव्या खूप जुनी आहेत. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा याबद्दलचं गाणं करणं हे साई पियूशने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे. पुन्हा नजाकतीने कसं उभं करू शकतो, यावर आम्ही छान काम केलं आहे". 


'बाईपण भारी देवा' का पाहावा? 


'बाईपण भारी देवा' का पाहावा याबद्दल बोलताना आदिती म्हणाली,"बाईपण भारी देवा' हा सिनेमा प्रत्येकाने पाहावा असा आहे. रोजच्या जगण्यातला हा सिनेमा आहे. प्रत्येकजण हा सिनेमा रिलेट करू शकतो. नात्यांची सांगड, दुरावा होऊन पुन्हा एकत्र येणं, परंपरा जपणं अशा सर्व गोष्टी या सिनेमात आहेत. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळेल". 


संबंधित बातम्या


Kedar Shinde : प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय 'बाईपण भारी देवा'; 'सिध्दीविनायकाचा महाप्रसाद' म्हणत केदार शिंदेंनी मानले आभार