Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. दरम्यान या सिनेमाच्या भारी टीमने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. 'बाईपण भारी देवा'चं नाव 'मंगळागौर' असल्याचा खुलासा दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी माझा कट्ट्यावर केला आहे.
'बाईपण भारी देवा'चं नाव होतं 'मंगळागौर'; केदार शिंदेंचा माझा कट्ट्यावर खुलासा
केदार शिंदे म्हणाले,"बाईपण भारी देवा' या सिनेमाचं नाव आधी 'मंगळागौर' होतं. सिनेमाच्या प्रोसेसदरम्यान या 'बाईपण भारी देवा' हे गाणं तयार झालं होतं. त्यावेळी अजित भुरेने गाण्यातीलच 'बाईपण भारी देवा' या कॅची ओळीवर सिनेमाचं नाव ठेवण्याचं सुचवलं.
केदार शिंदेंनी 'बाईपण भारी देवा' करण्याचं का ठरवलं?
केदार शिंदे म्हणाले,"वैशाली नाईकने 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचं लेखन केलं आहे. तिने मला या सिनेमाची वन लाईन ऐकवली तेव्हाच माझ्या मनात विचार आला की, हा सिनेमा पाहायला मी तिकीट काढून जाईल. 'बाईपण भारी देवा'ची संहिता मी जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हा या सहा व्यक्तिरेखांच्या भूमिकेत मला याच सहा अभिनेत्री दिसल्या होत्या. या सहा अभिनेत्रींनी लगेचच सिनेमासाठी मला होकार दिला. या अभिनेत्रींसोबत पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने मी एकत्र काम केलं आहे. दीपाने याआधी माझ्या एका नाटकात काम केलं होतं".
केदार शिंदे पुढे म्हणाले,"सहा अभिनेत्री एक उत्तम सहकलाकारदेखील आहेत. या सहा अभिनेत्री उत्कृष्ट दर्जाच्या आहेत हे सर्वसामान्य प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी हा सिनेमा यावा लागला हे दुर्देव आहे. सिनेमातल्या सहा अभिनेत्रींच्या मनात एकमेकींविषयी कोणतीही स्पर्धा नव्हती".
केदार शिंदेंनी सांगितला शूटिंगदरम्यानचा एक रंजक किस्सा
किस्सा शेअर करत केदार शिंदे म्हणाले,"मेकरुम ते सेट हा माझ्यासाठी मोठा टास्क होता. व्हॅनिटी ट्रिपल डोअरची होती. पण या अभिनेत्रींनी मधले सर्व दरवाजे सुरू करुन ठेवले होते. त्यामुळे चाळीसारखं वातावरण सेटवर निर्माण झालं होतं. माझी मुलगी सना ही या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शन करत होती. त्यावेळी पहिल्या दिवशी शॉट रेडी झाल्यावर ती वंदना गुप्तेंना बोलवायला गेली. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,"सांग तुझ्या बापाला येत नाही म्हणून". एकंदरीतच सेटवर गंमतीशीर वातावरण होतं.
'बाईपण भारी देवा'च्या टीमसोबत रंगणार माझा कट्टा
'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या टीमसोबत आजचा माझा कट्टा रंगणार आहे. 'बाईपण भारी देवा'च्या शूटिंगदरम्यानचे रंजक किस्से दिग्दर्शक केदार शिंदेसह अभिनेत्री वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांनी माझा कट्ट्यावर शेअर केले आहेत. हा विशेष कट्टा प्रेक्षकांना आज रात्री 8.30 वाजता एबीपी माझावर पाहता येणार आहे.
संबंधित बातम्या