मुंबई : नव्वदच्या दशकात गोविंदाच्या चित्रपटांची प्रचंड क्रेझ होती. गोविंदा आणि अमिताभ या जोडगोळीचा 'बडे मिया छोटा मिया' हा सिनेमाही खूप गाजला होता. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग येत असून अक्षयकुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यात मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
इरॉस एन्टरटेनमेंट आणि वाशू भगनानी एकत्रितपणे 'बडे मिया छोटा मिया 2' च्या निर्मितीत गुंतल्याची माहिती आहे. पहिल्या भागाची निर्मितीही वाशू भगनानी यांनीच केली होती, तर डेव्हिड धवन दिग्दर्शकाच्या खुर्चीत होते. दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन कोण करणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
अक्षयकुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या वर्षी 'ब्रदर्स' या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यानंतर बडे मियाचा दुसरा भाग त्यांचा दुसरा एकत्रित सिनेमा ठरणार आहे.
'बडे मिया...' 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन आणि कॉमेडी किंग गोविंदा यांचा डबल रोल होता. तर अनुपम खेर, रविना टंडन, रम्या क्रिष्णन या कलाकारांसोबत माधुरी दीक्षितही पाहुण्या भूमिकेत झळकली होती. बिग बी यांच्या कमबॅकनंतरचा हा पहिला हिट सिनेमा होता. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने कमाल केली होती आणि 1998 मध्ये कुछ कुछ होता है नंतर
वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला होता.