इरफान खान.. आपल्या कामातून अमर झालेला अभिनेता. त्याने जे चित्रपट केले त्या प्रत्येकात त्याने आपली छाप सोडली. सहकलाकाराची भूमिका वठवता वठवता त्याच्यासाठी सिनेमे बनू लागले आणि त्या प्रत्येक सिनेमातून तो आपली वेगळी ओळख दाखवू लागला. आपल्या अभिनयाचे नवनवे पैलू लोकांसमोर मांडू लागला. तो इरफान लॉकडाऊन लागल्यानंतर काही काळातच आपल्यातून निघून गेला. गेल्या अनेक महिन्यांपासून तो कर्करोगासोबत दोन हात करत होता. त्याची ही लढाई अखेर संपली आणि इरफान गेला.





इरफान गेला असला तरी चित्रकृतीतून तो जिवंत आहेच. त्याच्या सर्वच चाहत्यांना.. अस्सल सिनेरसिकांना इरफानची उणीव नेहमीच जाणवत राहील. समान्य माणसांची ही गत तर त्याच्या कुटुंबियांचं काय होत असेल? म्हणूनच इतके महिने उलटूनही त्याच्या कुटुंबियांना आणि त्यातही त्याच्या मुलाला.. बाबिलला इरफानचा मृत्यू अजून पचलेला नाही. आपल्या सोशल मीडियामधून बाबिल नेहमी व्यक्त होत असतो. आता त्याच्या नव्या पोस्टमधूनही तो इरफानला किती मिस करत असेल ते जाणवतं. बाबिलने लिहिलेल्या नव्या पोस्टमध्ये तो म्हणतो, 'मला अजूनही वाटतं तू कुठल्या तरी मोठ्या चित्रिकरणासाठी निघून गेला आहेस. मला असं वाटतं की तुझं चित्रिकरणं एखाद्या पाण्याच्या तळाशी सुरू असेल आणि ते चित्रिकरण झाल्यावर तू अचानक पाण्याच्या प्रतलावर प्रगटशील.' अशी पोस्ट करतानाच बाबिलने इरफानचा मोराला घेऊन असलेला एक फोटो शेअर केला आहे.


सोनू निगम म्हणतो, माझ्या मुलाने गायक व्हावं पण भारताबाहेर


इरफान खान यांच्या निधनाने हिंदीसह जगभरातले सिनेकर्ते हळहळले होते. पण त्यावेळी लॉकडाऊन असल्यामुळे कुणालाच कुणाची भेट घेता आली नव्हती. आता पुन्हा एकिकडे देशात अनलॉकिंगची प्रक्रिया सुरु असतानानच इरफानची उणीव भासणं साहजिक आहे. इरफानने केलेले चित्रपट पाहता आता खरंतर त्याच्यासाठी बनणाऱ्या चित्रपटांचा ट्रेंड होता. हिंदी मीडिअम, पिकू, लंच बॉक्स, पानसिंग तोमर आदी चित्रपट त्याने केले खरे. पण हिंदी इंडस्ट्रीत आता वास्तवदर्शी चित्रपटांची लाट आली आहे. आता खरतंर इरफानसारख्या चतुरस्र कलाकाराची निकड असताना त्याने या जगाचा निरोप घेतला. बाबिलला बाबाची आठवण येणं साहजिक आहे. बाबिलने पोस्ट केल्यावर इरफानच्या चाहत्यांनी आणि बाबिलच्या मित्रांनी त्याची बरीच समजूत काढली आहे हेही नव्यानं सांगायला नको.