Baba Siddiqui Murder Case : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी राज्यमंत्री बाब सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी फरार आहे. याप्रकरणामागे बिश्नोई गँगचा (Lawrence Bishnoi Gang) हात असल्याचं सांगितलं जात आहे. सलमान खानशी (Salman Khan) जवळीक असल्यानं बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, माजी राज्यसभा खासदार आणि भाजप नेते हरनाथ सिंह यादव (Harnath Singh Yadav) यांनी सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागा, असा सल्ला दिला आहे. 


भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, बिश्नोई समाज काळविटाला देव मानतो आणि त्यांची पूजा करतो आणि तुम्ही त्यांची शिकार केली, त्यामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी पुढे लिहिलं आहे की, बिश्नोई समाजाच्या भावनांचा आदर करत आपल्या मोठ्या चुकांबद्दल बिश्नोई समाजाची माफी मागितली पाहिजे.


सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त 


बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रात मोठा वावर असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरून गेला आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 




सिद्दिकींच्या हत्येबाबत सोशल मीडियावर पोस्ट


बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगनं सिद्दिकींची हत्या केल्याचं समोर आलं. यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टही करण्यात आली. ही पोस्ट व्हायरल झाली आहे. शुब्बू लोणकर नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीनं बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांकडून या पोस्टसंदर्भात अधिक तपास सुरू आहे. 


दरम्यान, बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान बऱ्याच काळापासून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्पशुटर्सनी बऱ्याचदा सलमान खानची रेकी देखील केल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी पहिली रेकी रेडी चित्रपटादरम्यान झाली होती. तर, दुसऱ्यांदा पनवेलच्या फार्म हाऊसची रेकी करण्यात आली होती. याशिवाय लॉरेन्स विश्नोई गँगनं सलमान खानच्या घरावर आतापर्यंत तब्बल तीन वेळा गोळीबार केला आहे. 


सलमान खान टार्गेट असल्याचा लॉरेन्स बिश्नोईचा कबुलनामा 


बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईनं अनेकदा सलमान खान निशाण्यावर असल्याची कबुलीदेखील दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईनं त्यांच्या निशाण्यावर सलमान खान असल्याचं NIA समोर कबुल केलं होतं. 1998 मध्ये सलमान खाननं एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान जोधपूरमध्ये काळविटाची शिकार केली होती. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो. पूज्यस्थानी असलेल्या काळविटाची शिकार केल्यामुळे सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. 


लॉरेन्स बिश्नोई त्याचा सर्वात जवळचा मित्र आणि नेमबाज संपत नेहराला सलमान खानच्या मुंबईतील घराची रेकी करायला पाठवलं होतं. पण संपत नेहराला हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. लॉरेन्स बिश्नोईनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमप्रमाणे स्वतःची टोळी तयार केली आहे.


लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची टोळी अनेक राज्यांमध्ये पसरली असून त्यांच्याकडे 700 हून अधिक शूटर्स असल्याचं एनआयएच्या आरोपपत्रात उघड झालं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं 1990 च्या दशकात आपल्या टोळीचा विस्तार केला होता. त्याच पद्धतीनं बिश्नोई आणि त्याची टोळी पुढे जात असल्याचा दावा एनआयएनं केला आहे.