Mile Sur Mera Tumhara : देशाच्या स्वातंत्र्याला पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशभरात 'आझादी का अमृतमहोत्सव' साजरा करण्यात येत आहे. केंद्र आणि सर्व राज्यातील सरकारने यानिमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हे सर्व कार्यक्रम वर्षभर चालणार आहेत. याचाच एक भाग म्हणून रेल्वे मंत्रालयाने ९० च्या दशकातील मात्र आजही लोकप्रिय असलेले मिले सुर मेरा तुम्हाला नव्या रुपात आणले आहे. या गाण्याचा इतिहास पाहणे मनोरंजन ठरेल.






८०-९० च्या दशकात 'मिले सुर मेरा तुम्हारा' हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. देशाला एकतेच्या धाग्यात गुंफणारे हे गाणे एक प्रकारे राष्ट्रगीतच झाले होते. दूरदर्शनवर शेकडो वेळा हे गाणे दाखवण्यात आले होते आणि आजही दाखवले जाते. देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातील भाषांमध्ये या गाण्याच्या ओळी तयार करण्यात आल्या होत्या. या गाण्यात संगीत, खेळ आणि कलेच्या क्षेत्रातील पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, भूपेन हजारिका, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जितेंद्र, शबाना आझमी, मल्लिका साराभाई, कमल हसन, तनुजा, जावेद अख्तर यांच्यासह सुनिल गावस्कर, पी. टी. ऊषा, कपिल देव, प्रकाश पदुकोण, मिल्खा सिंह, मंसूर अली पतौडी या नामवंत कलाकारांनी भाग घेतला होता.


हे गाणे तयार करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला होता. प्रख्यात अभिनेत्री नूतन आणि तनुजाचे बंधू जयदीप समर्थ यांनी राजीव गांदी यांना या गाण्याची कल्पना ऐकवली होती. राजीव गांधींना ही कल्पना प्रचंड आवडली होती आणि त्यांनी लगेचच गाण्याच्या निर्मितीला परवानगी दिली. चित्रपट निर्माते कैलास सुरेंद्रनाथ यांनी या गाण्याच्या निर्मितीचे शिवधनुष्य उचलले होते. पियूष पांडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला प्रख्यात संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिले होते. मात्र संगीत देण्याच्या श्रेयावरून वाद उद्भवला होता. पंडित भीमसेन जोशी यांच्या मुलाने जयदीपने मात्र या गाण्याची चाल पंडित भीमसेन जोशी यांनी तयार केल्याचे म्हटले होते. त्या वादात आपल्याला पडायचे नाही.


१३ भाषांमध्ये असलेले हे गाणे १५ ऑगस्ट १९८८ ला सर्वप्रथम हे गीत दूरदर्शनवर दाखवण्यात आले होते.



 


काही वर्षांपूर्वी ए. आर. रहमान आणि सलमान, आमिर यांना घेऊन 'फिर मिले सुर मेरा तुम्हारा' गाणे तयार करण्यात आले होते. आता हेच गाणे रेल्वे मंत्रालयाने नव्या स्वरूपात तयार केले आहे. गाण्याचा बाज आणि मूड तोच ठेवत देशाला रेल्वे कशी जोडते हे या गाण्यातून रेल्वे मंत्रालयाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे मार्गाची अत्यंत सुंदर दृश्ये या गाण्यात दिसत आहेत. या गाण्यात चित्रपट कलाकारांऐवजी रेल्वे मंत्रालयाने शटरल पी. व्ही, सिंधूसह नुकत्याच टोक्योत झालेल्या ऑलिंपिकमधील पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचा समावेश केलेला आहे. रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या ट्विटर हँडलवर हे गाणे रिलीज केले आहे. गाण्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेचे महत्व सांगताना दिसतात. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मिले सुर मेरा तुम्हारा गाताना या व्हीडियोत दिसतात. तर शेवटी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वेचे अधिकारी राष्ट्रगीत गाताना दिसतात.