औरंगाबाद: औरंगाबाद सत्र न्यायालयाने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.
रामगोपाल वर्मा यांचा 2009 मध्ये अज्ञात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या सिनेमाची कथा आपली असून, ती वर्मांनी चोरल्याचा आरोप औरंगाबादमधील मुस्ताक मोहसिन यांनी केला होता.
मोहसिन यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयानं रामगोपाल वर्मांसह निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्याविरोधातही अटक वारंट काढलं आहे.
अज्ञात सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी मोहसिननं त्याची स्क्रिप्ट रामगोपल वर्मांना दिली होती. काही दिवसांनी चित्रपट प्रदर्शित झाला, मात्र मोहसिनला कथेचं श्रेय न देता वर्मा यांनी सिनेमात नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांना दिले होतं. त्यानंतर मोहसिन यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
"मी ही कथा राम गोपालला पाठवली होती. नंतर त्यांचे काहीच उत्तर आले नाही. पण काही दिवसांनी अज्ञात सिनेमा पाहिला तेव्हा तो संपूर्ण सिनेमा माझ्याच कथेवर असल्याचे मला समजले. त्यामुळेच मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे", असं मोहसिनने म्हटलं आहे.