Atul Parchure: नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांची कॅन्सरची झुंज, त्यादरम्यान येणारे अनुभव या सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे.


सौमित्र पोटेला दिलेल्या मुलाखतीमध्ये  अतुल परचुरे यांनी सांगितलं,  '2020 मध्ये माझ्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा करोना होता त्यामुळे आम्हाला कुठे जाता आलं नाही. 2022 मध्ये आम्ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेलो. मी खूप फुडी आहे. त्यामुळे तिथे जाऊ काय खायचं, ते आम्ही ठरवून गेलो होतो. तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी मला असं जाणवलं की मला खावसं वाटतं नाहीये. काहीही समोर आलं तरी खावसं वाटत नव्हतं.'


पुढे ते म्हणाले, 'माझा तिथे एक भाऊ होता, तो डॉक्टरचं आहे. त्याला वाटलं की, काही तरी इंफेक्शन झालं आहे. त्यामुळे त्यानं मला औषधं दिली. आठ-दहा दिवस मी ती औषधे घेतली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी परत भारतात आलो आणि त्यानंतर मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांना सांगितलं की, मला खावसं वाटत नाही. दोन तीन डॉक्टरांनी मला औषध दिली. पण माझा एक मित्र डॉक्टर आहे. मी त्याच्याकडे गेलो.तो मला म्हणाला आपण अल्ट्रासोनोग्राफी करुन बघूयात. सोनोग्राफी करताना त्या डॉक्टरच्या चेहऱ्यावरील बदलणारे हावभाव मला कळत होते. मी अंदाज लावला होता काही तरी गडबड आहे. त्यानंतर सिटीस्कॅन देखील केला. '


'एका डॉक्टरनं मला सांगितलं की, 'लीव्हरमध्ये आम्हाला ट्युमर दिसला आहे. तो ट्युमर 5 सेंटीमीटरचा आहे. त्यानंतर मी त्यांना कॅन्सर झालाय का? असं विचारलं तर ते हो म्हणाले. त्यानंतर मी घरी आल्यावर पहिल्यांदा आईला सांगितलं. मला आईनं सांगितलं,   तुला काहीही होणार नाही काळजी करु नको. मी एका हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालो होतो. मला असं वाटतं की, तिथे सुरु असलेली ट्रीटमेंट मला चुकीची वाटली. त्या हॉस्पिटमधून मी घरी आल्यानंतर माझे पाय सुजले होते.त्यानंतर मी हॉस्पिटल बदललं.'असंही अतुल यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं


पुढे अतुल परचुरे यांनी सांगितलं, 'माझे रिपोर्ट्स पुण्यातील एका डॉक्टरांकडे पाठवले. त्या डॉक्टरांनी मला सांगितलं, तुम्हाला काही होणार नाही.मी पूर्णपणे बरा झालो आहे की नाही हे मला लवकरच कळेल.


'मी अनेक वर्षांपासून कपिल शर्मा करत आहे. त्याने मला सुमोनाच्या वडिलांच्या भूमिकेसाठी बोलावले. पण त्या एपिसोडमध्ये परफॉर्म करू शकलो नाही. मी कपिलसोबत आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाऊ शकलो असतो.' असंही अतुल परचुरे  यांनी सांगितलं.


 मेडिक्लेम काढण्याचे चाहत्यांना केले आवाहन


अतुल परचुरे यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं,  'मध्यमवर्गीय माणसानी सध्या आजारी पडणं,  ही गोष्ट खूप भयानक आहे. खूप प्रमाणात पैसे खर्च होतात. यानिमित्तानं मी हे सांगू शकतो की, प्रत्येकानी मेडिक्लेम काढा. मेडिक्लेमनं मला आधार मिळाला.'