Pankaj Tripathi On Movie Atal : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयेपी यांच्या आयुष्यावर आधारित 'अटल' (Atal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता या सिनेमात पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


पंकज त्रिपाठी एक अभ्यासू अभिनेता आहे. त्याच्या सटल अभिनयाने तो नेहमीच प्रेक्षकांना वेड लावतो. त्यामुळे आता पंकजला अटलजींच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 


पंकज त्रिपाठी म्हणाला,"अटल' या सिनेमात मला अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारायला मिळणं हा माझा खूप मोठा सन्मान आहे. माणुसकी जपणाऱ्या राजकारण्याची भूमिका मी साकारणार आहे. अटल बिहारी वाजपेयी राजकारणी असण्यासोबत एक उत्तम लेखक आणि कवीही होते. हिंदी भाषेवर त्यांचं खूप प्रभुत्व होतं. त्यामुळेच त्यांची भूमिका साकारणं खूप आव्हानात्मक आहे". 






'मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल' हा सिनेमा पेंग्विन रँडम हाऊस इंडियाच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशियन अँड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पुढील वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'नटरंग', 'बालगंधर्व' अशा अनेक लोकप्रिय सिनेमांचं दिग्दर्शन केलेले रवी जाधव या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. सिनेमासंदर्भात रवी जाधव म्हणाला,"अटलजींसारखं व्यक्तिमत्त्व आणि पंकज त्रिपाठीसारख्या अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. एक दिग्दर्शक म्हणून यापेक्षा चांगल्या गोष्टीची मी कल्पना करू शकत नाही. 


संबंधित बातम्या


Atal Bihari Vajpayee : अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर येतोय सिनेमा; 99 व्या जयंतीला होणार रिलीज