Ashwini Mahangade On Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला (Maratha Reservation) राज्यभरातून पाठिंबा मिळतो आहे. दरम्यान 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेदेखील (Ashwini Mahangade) या आंदोलनात सहभागी झाली आहे. मराठे कधीच कोणाच्या हक्काचे खाणारे नाहीत. त्यांना हक्काचं आरक्षण हवं आहे, असं मत अश्विनी महांगडेने मांडलं आहे.


एबीपी माझाशी बोलताना अभिनेत्री अश्विनी महांगडे म्हणाली,"मराठा क्रांती मोर्चामध्ये मी आधीपासूनच सहभागी आहे. ही लढाई यावर्षी सुरू झाली असं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. माझा ज्या परिसरात जन्म झाला तिथे आठवी-दहावीनंतर मुलं लष्करात भरती होण्याचं स्वप्न पाहतात. त्यासाठी ते घेत असलेली मेहनत मी पाहिली आहे. आजही 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के असणारा विद्यार्थी भरती होत नाही. तर 60% मिळवणारा विद्यार्थी भरती होतो. त्यावेळी असं वाटतं की, प्रत्येकाच्या कुवतीनुसार ती जागा द्या. आता ही गोष्ट आपल्या देशात शक्य नाही. मग जर असं नसेल तर आम्हाला दुसरं कोणाचं आरक्षण नको आहे. किंवा त्यांच्यातला वाटा नको आहे. आम्हाला आमचं स्वतंत्र आरक्षण द्या. म्हणजे मेहनत घेणाऱ्या आमच्या मुलांना यश मिळेल. आरक्षण ही खरचं काळाची आणि मराठा मुलाची आणि मुलीची गरज आहे आणि ते व्हायला हवं". 






मनोज जरांगे पाटलांना अश्विनी महांगडेचं समर्थन


मनोज जरांगे पाटलांना अश्विनी महांगडे समर्थन देत आहे.  याबद्दल बोलताना ती म्हणाली," एक दिवस उपाशी राहायचं असेल तर आपल्याला ते जमत नाही आणि ज्यावेळी एक माणूस ही एवढी मोठी चळवळ इतक्या छान पद्धतीने मॅनेज करतो ही गोष्ट आहे. मराठ्यांनी इतकी वर्ष शांततेत आंदोलन केलं. पण कुठेतरी सहनशक्तीला पण मर्यादा असते. बरं मी पूर्णपणे शासनाला दोष देते असं नाही. हायकोर्टात ज्या पद्धतीने सगळी प्रोसेस सुरू आहे तेही चालुच आहे. पण किमान राज्याच्या अख्यारीत या गोष्टी होऊ शकतात तेव्हा सगळ्या आमदार, खासदारांनी एकत्र येऊन आरक्षण द्यायला हवं. इतकी वर्ष एक विषय तुम्ही इतका कसा काय चिघळत ठेऊ शकता".


ज्यांना निवडून दिलं आहे तेच लोक...


अश्विनी पुढे म्हणाली,"मला अजूनही वाटतं मराठा आरक्षणाचं आंदोलन शांत पद्धतीनेच व्हावं. पण कुठेतरी शासनानेसुद्धा इतका मोठ्या समाजाचा विचार करावा आणि सहनशक्ती आणखी बघू नये. एवढीच माझी शासनाला विनंती आहे. ज्यांना निवडून दिलं आहे तेच लोक याचा विचार करत नसतील तर अवघड आहे. त्यांनी मार्ग काढायला हवा".


मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण हवं आहे : अश्विनी महागंडे


मनोज जरांगेंबद्दल बोलताना अश्विनी म्हणाली,"जरांगे पाटील साहेबांमुळे एक चेहरा मिळाला आहे. तो चेहरा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काम करतोय असंही नाही. तर ते स्वत: लढत आहेत. स्वत: उपाशीपोटी काम करत आहेत. मग अशावेळी समाजासाठी उभं राहणं हे वाईट नाही. ज्यांना आता आरक्षण आहे त्यांच्यातलं आरक्षण मराठ्यांना कधीच नको आहे. मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. मराठे कधीच कोणाच्या हक्काचे खाणारे नाहीत. शांततेच मराठा आरक्षण यशस्वी होईल अशी मी अपेक्षा करते". 


संबंधित बातम्या


Manoj Jarange : "मनोज जरांगेंना काही झालं तर सरकारने तयारी ठेवावी"; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत