Aryan Khan With Kiran gosawi : सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स केस मध्ये किरण गोसावी हा मुख्य साक्षीदार आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर आणि एबीपी माझाने केलेल्या शोध मोहिमेनंतर किरण गोसावी हा अनेक गुन्ह्यात आरोपी असून फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे. याच किरण गोसावीचा थांगपत्ता आता कोणालाच लागत नाहीये.


बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या विरुद्ध केलेल्या कारवाई वर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या मोठा गौप्यस्फोटामुळे एनसीबी अधिकाऱ्यांच्या अडचणीत निश्चित वाढ झाली आहे. आता या प्रकरणात ज्या किरण गोसावीला एनसीबी मुख्य साक्षीदार सांगत आहे तो गोसावी एक सराईत गुन्हेगार असल्याचा खुलासा होत आहे. एबीपी माझा च्या हाती लागलेल्या माहितीनुसार किरण गोसावी विरुद्ध एक नाही दोन नाही तर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दाखल असलेल्या सर्व गुन्ह्याची कुंडलीच एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 


गुन्हा नंबर 1
आरोपी किरण प्रकाश गोसावी याने मे 2018 मध्ये फेसबुकवरून मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणाची 3 लाख रुपयांनी फसवणूक केली होती. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी 29 मे 2018 रोजी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात तो आजतागायत फरार आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्याचा शोध आता पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.


गुन्हा नंबर 2
नवाब मलिक यांनी आरोप केलेला किरण गोसावी हा ठाण्यातील ढोकाळी इथला राहणारा आहे. त्यावर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा कलम 420 अंतर्गत म्हणजेच फसवणुकीचा गुन्हा आहे. 2015 साली दाखल झालेल्या या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. एका व्यक्तीला नोकरीचे आमिष दाखवून हजारो रुपये या किरण गोसावीने त्या व्यक्तीकडून उकळले होते. त्यामुळे पोलिसांनी किरण गोसावीला अटक केली होती. त्यानंतर या केसमध्ये आरोपपत्र फाईल करून सध्या केस कोर्टात प्रलंबित आहे.


गुन्हा नंबर 3
किरण गोसावी विरुद्ध तिसरा गुन्हा मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये 3 जानेवारी 2007 ला व्यंकटेशन शिवा वायरवेल नावाच्या तक्रारदारने किरण गोसावी विरुद्ध तक्रार दिली.  व्यंकटेशनने आरोप केला होता की किरण गोसावी आणि विनोद मकवाना या दोन्ही आरोपींने त्यांच्या क्रेडिट कार्डने 17 हजार 500 रुपयांची शॉपिंग केली आणि त्यांना फसवले. या प्रकरणात दोघांनाही मे 2007 मध्येच पोलीसांनी अटक केली होती आणि कोर्टात आरोपपत्र ही दाखल केलं होतं. पण नंतर याप्रकरणात गोसावी आणि दुसऱ्या आरोपीचा निर्दोष मुक्त करण्यात आला आहे.


आयर्न खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा किरण गोसावी सोबतचा फोटो व्हायरल झाला होता. किरण गोसावी याने आर्यन खानसोबत सेल्फी काढला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत किरण गोसावीवर आरोप करत एनसीबीच्या कारवाई वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता ज्या केस मध्ये करुन गोसावी फरार आहे त्या केस मध्ये त्याला अटक करण्याची तयार पुणे पोलीस करत आहेत. 


पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या माहितीनुसार एबीपी माझा ने किरण गोसावी चा शोध सुरू केला. यावेळी अत्यंत धक्कादायक माहिती एबीपी माझाच्या हाती लागली. पोलीस दलात नोकरी करून निवृत्त झालेले प्रकाश गोसावी यांचा मुलगा हा किरण गोसावी आहे. सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत. गेली अनेक वर्षे ते ठाण्यातील ढोकळी इथं एका सोसायटीमध्ये राहतात. मात्र किरण आणि आमचा गेल्या 12 वर्षांपासून काहीही संबंध नाही असे त्याच्या कुटुंबीयांनी एबीपी माझाला सांगितले. किरणचे बी कॉम पर्यंत शिक्षण झालेले आहे, मात्र तो व्यवसनाधीन असल्याची माहिती देखील एबीपी माझाला मिळाली आहे. किरण विवाहित असून त्याला १० वर्षाचा मुलगा आहे. किरणला त्याच्या पत्नीने सहा वर्षांपूर्वीच घटस्फोट दिलेला असलायची माहिती समोर येत आहे. किरणमुळे गेली अनेक त्याच्या कुटुंबियांना त्रास होत असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधींना दिली. 


एकूणच किरण गोसावी हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असल्याचे एबीपी माझाच्या शोधमोहीम येथून समोर आले आहे. असे असताना एन सी बी किरण गोसावीला मुख्य साक्षीदार म्हणून सांगत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला आणि फरार म्हणून घोषित असलेला एक आरोपी एन सी बी सारख्या केंद्रीय यंत्रणेसाठी मुख्य साक्षीदार बनू शकतो का, एन सी बी च्या अधिकाऱ्यां ऐवजी आर्यन खान ला क्रूज वरून एनसीबी कार्यालयात घेऊन येऊ शकतो का, तसेच एनसीबी च्या कस्टडीत असताना त्याच्या सोबत सेल्फी काढू शकतो का असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.